मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिंदे गट यांच्यात वाद .

0
184

पुणे दि.२४ (पीसीबी) : राज्यात सत्तातर झाले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, त्यानंतरही या खुर्चीवरील वाद अद्याप संपलेला दिसत नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिंदे गट यांच्यात वाद पेटला आहे.शुक्रवारी खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसले आहेत, असा फोटो राष्ट्रवादीनं व्हायरल केला. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला होता. श्रीकांत शिंदे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा असं खोचक टि्वट त्यांनी ही केलं होतं.

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यानंतर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या काळात सुप्रिया सुळेया मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्या आहेत असा फोटो टि्वट केला. या फोटोवरून राजकारण रंगलं आहे. या फोटोवरुन राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने आता पोलिस ठाणे गाठले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातला फोटो शीतल म्हात्रे यांनी ट्विट केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्या आहेत असं दिसतं आहे. त्यांच्या शेजारी तत्कालीन आरोग्य मंत्री असलेले राजेश टोपे आणि तत्कालीन गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही बसल्याचं दिसतं आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावर ट्विट करत हा फोटो बघा कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय? असा प्रश्न विचारत शीतल म्हात्रे यांनी हा फोटो ट्विट केला आहे.

सुप्रिया सुळे यांचा जो फोटो वापरण्यात आला आहे तो फोटो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सन 2022 मधील एका कार्यक्रमातील आहे, याचा पुरावा म्हणून तो फोटो आदिती नलावडे यांनी टि्वट केला. राष्ट्रवादीने याबाबत सायबर पोलिसांकडे शीतल म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हटलं आहे. म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दिली आहे. … आता त्यांना सांगा काय ते Editing, काय ते Morphing, सर्व कसं ओके करणार आहेत पोलीस असं ट्विट करत वरळी पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रेंच्या विरोधात केलेली तक्रार आदिती नलावडे यांनी ट्विट केली आहे.