पॅनेल प्रमुख प्रमोद कुटे यांची जादू
पिंपरी, दि. १७ – भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सभा झालेल्या प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्तीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. या प्रभागात राष्ट्रवादीचेपॅनेल प्रमुख प्रमोद कुटे यांची जादू चालली आहे.
प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडीमधील निवडणूक भाजपने अतिशय प्रतिष्ठेची केली होती. शहरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमेव सभा या प्रभागात घेतली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
यांच्याही येथे सभा झाल्या. एवढ्या मोठ्या नेत्यांच्या सभा होऊनही राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल प्रमुख प्रमोद कुटे हे थोडेही विचलित झाले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी थेट नागरिकांच्या गाठीभेटीवर भर दिला. विरोधी उमेदवाराविरोधात टीका-टिप्पणी करणे टाळले. पक्षाचा एक नेता विरोधी उमेदवाराला सहकार्य करत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले. कुटे यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार प्रसाद शेट्टी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. स्वतः कुटे दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांच्याबरोबर वैशाली काळभोर या ही निवडून आल्या. काळभोर यांची ही तिसरी टर्म आहे.
गेल्या 35 वर्षांपासून समाजकारण करत असलेले गणेश लंगोटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले. त्यांच्या पत्नी अरुणा लंगोटे यांना पॅनलमध्ये घेतले. अरुणा लंगोटे यांनाही मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. त्यांनी मातब्बर घरातील उमेदवाराचा पराभव केला. या विजयाने गेल्या 35 वर्षांपासून समाजाची सेवा करणाऱ्या गणेश लंगोटे यांना जनतेने आशीर्वाद दिला आहे. पॅनलमधील विशाल काळभोर यांचा निकटचा पराभव झाला. पण, अपयशाने खचून न जाता विशाल हे पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागतील असा विश्वास प्रमोद कुटे यांनी व्यक्त केला.
याबाबत नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, आम्ही अतिशय बारकाईने नियोजन करून एकत्रित प्रचार केला. मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या तरी आम्ही विचलित झालो नाहीत. कारण, आमचा प्रभागातील लोकांवर विश्वास होता. प्रभागातील नागरिकांनी विश्वास ठेवून आमचे तीन उमेदवार निवडून दिले. हा विजय आमचा नसून प्रभागातील जनतेचा आहे. हा विजय जनतेला समर्पित आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही तिघेही कटिबद्ध आहोत.












































