मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देता यावा यासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघासमवेत विशेष बैठक

0
83

पिंपरी, दि. १३ ऑगस्ट (पीसीबी) – ६५ वर्षे व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य, उपकरणे खरेदी करता यावीत तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यांदीद्वारे त्यांचे मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन प्रशिक्षणाकरिता मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत असून जास्तीत जास्त लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे श्री.तानाजी नरळे सहाय्यक आयुक्त समाज विकास विभाग आवाहन यांनी केले.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ पिंपरी चिंचवड शहरातील वयोवृद्ध नागरिकांना घेता यावा यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने आज वल्लभनगर येथील कै. मंगलसेन बल विरंगुळा केंद्रात बैठक पार पडली, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री . तानाजी नरळे सहाय्यक आयुक्त समाज विकास विभाग बोलत होते.

या बैठकीस डॉ.लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधिकारी डॉ. नलावडे, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, सामाजिक कार्यकर्त्या नम्रता रणसिंग, लिपीक अनिकेत सातपुते तसेच ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ६५ वर्षे व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एकावेळ एकरकमी रक्कम रुपये ३ हजार डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या लाभामुळे पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारिरिक असमर्थतता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टीक, व्हीलचेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सवाईकल कॉलर इत्यादी साधने खरेदी करता येऊ शकतात, अशी माहिती समाजविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी यावेळी दिली. 

या योजनेअंतर्गत शासनामार्फत १०० टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे रक्कम रुपये ३ हजार रुपये मर्यादित निधी वितरण करण्यात येणार असून योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देता यावा यासाठी विविध ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण (पॉप्युलेशन बेस्ड स्क्रिनींग) व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत सर्वेक्षण व स्क्रिनींग घरोघरी जावून करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ.लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

या बैठकीदरम्यान, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघातील पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या वतीने ५ हजार ऑफलाईन अर्जांच्या प्रती आणि स्वयंघोषणापत्र देण्यात आले आणि योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत आवाहन करण्यात आले.