मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, फक्त प्रसिध्दीसाठी २०० कोटी

0
73
xr:d:DAF16ju30gQ:22,j:269501511602144086,t:23120610

दि. १७ ऑगस्ट (पीसीबी) – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेसंदर्भात जनजागृतीसाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्नदेखील केले जात आहेत. मात्र, आता या योजनेसंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने या योजनेच्या केवळ प्रसिद्धीसाठी जवळपास २०० कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा मुद्दा आता चर्चेत आला असून विरोधकांनी यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट शासनाचा आदेशच एक्सवर शेअर करून सताप व्यक्त केला आहे.

काय आहे शासकीय आदेशामध्ये?
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या शासन आदेशामध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ प्रसिद्धीसाठी १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार ४३६ रुपये मंजूर करण्यात आल्याचं नमूद केलं आहे. तसेच, या निधीचा वापर योजनेच्या प्रसिद्धीसाठीच्या कार्यक्रमांवर कसा करावा, याबाबतचा तपशीलही देण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेसोबत समन्वय साधून माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिद्धी आराखड्यावर काम करावं, असं या आदेशात म्हटलं आहे.

“प्रचार व प्रसिद्धीसाठी मिडिया प्लॅनिंग करणे, व्हिडीओ व ऑडिओ जाहिरातींचे क्रिएटिव्ह, इतर माध्यमांवरील प्रसिद्धीचा मजकूर यासंदर्भातली कार्यवाही नियमानुसार करावी. ही प्रसिद्धी विहीत नियमांनुसार होईल याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील. या जाहिरातींचं नियंत्रण व पर्यवेक्षण महिला व बाल विकास विभागानं करावं”, असं शासकीय आदेशात नमूद करण्यात आलं आहे.