पुणे दि. १० (पीसीबी) – मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहिल्यांदाच विठुरायाची महापूजा होणार आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी जात असताना, हडपसर भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी गाडीतळ येथे त्यांचं जंगी स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे, शिवसेना नेते अजय भोसले, शिवसेना नेते किरण साळी यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मी आणि आमचे २० आमदार अशा सर्वांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आपल्या सर्वांना बाळासाहेबांचे हिंदुत्व माहिती आहे. आता या राज्याला प्रगतीपथाकडे घेऊन जाण्यासाठी, सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी जे काही करता येईल, ते आम्ही निश्चितपणे करणार आहोत. किंबहुना आमचा तसा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.’
‘दिल्ली येथे राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री यांची मी भेट घेऊन आलो आहे. त्यावेळी इतर मंत्र्यांचीदेखील भेट झाली. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे पाठिंबा देईल, असे आश्वासन या भेटींमध्ये मिळाल्याचे शिंदे म्हणाले.
‘अमरनाथ येथील यात्रेमध्ये आपल्या राज्यातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुठेही ढोल-ताशा वाजवू नका,’ असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना करीत मुख्यमंत्र्यांनी मृतांना श्रध्दांजली वाहिली. आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्र्यांना पंढरपूर येथे पोहचायचे आहे. त्यामुळे त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि आठवले गटाचे आभार मानून प्रस्थान केले.