मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ

0
97

पिंपरी, दि.10 (पीसीबी) पिंपरी, :- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरातील महिला भगिनींना जास्तीतजास्त सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून भगिनींच्या वेळेची बचत करणे तसेच गर्दी टाळणे यासाठी शहरात १२३ सुविधा केंद्र, पुरेशा मनुष्यबळासह आजपासून कार्यान्वित केली असून आवश्यकता भासल्यास महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्थापित केलेल्या सुविधा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली तसेच जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या राज्यशासनाच्या महत्वकांक्षी योजनेचा महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील महापालिकेच्या जुन्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, समूह संघटक वैशाली खरात, रेशमा पाटील तसेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह महिला बचत गट आणि स्वयंसहायता गटाचे सभासद, पात्र लाभार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी शहरातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात मुख्य चौक आणि गर्दीची ठिकाणे निश्चित करून एकूण १२३ सुविधा केंद्र स्थापित करण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिकेची ८ क्षेत्रीय कार्यालये, ५७ मनपा शाळा, १७ करसंकलन कार्यालय, तसेच मुख्य चौक, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ यासारखी ४१ शिबीर ठिकाणे यांचा समावेश आहे. या योजनेला महिलांचा संभाव्य प्रतिसाद व त्यामुळे वाढणारी गर्दी लक्षात घेऊन सुविधा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येईल तसेच ३१ ऑगस्ट पूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचेही आयुक्त सिंह यांनी सागितले.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला ठेवलेली रहिवासी आणि उत्पन्नाच्या दाखल्याची अट राज्य शासनाने कमी केली असून पिवळ्या अथवा केशरी शिधावाटप पत्रिकेच्या आधारे लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याकरिता लाभार्थीकडे आधार कार्ड असणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. ही योजना राबविणे तसेच योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महिला बचत गटांची मदत घेण्यात येणार असून घरोघरी जाऊन नोंदणी देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पात्र लाभार्थ्यांना आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते अर्ज स्वीकृती पोहोच देण्यात आले. यावेळी बोलतांना दीपा जोगदंड या लाभार्थी भगिनीने शासनाची मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या मोहिमेसाठी महापालिकेने शहरात सर्वत्र ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्य येळे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.