‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण’ योजनेमुळे भगिनींचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
89

दि. १८ (पीसीबी) – गिरगाव चौपाटी येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश विसर्जनाच्या वेळी श्री गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून बाप्पाला निरोप दिला. यावेळी विविध देशांच्या दूतावासाच्या प्रतिनिधींनीही हजेरी लावली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देश-विदेशातील पर्यटकांसाठी उभारलेल्या विशेष दर्शन गॅलरीला राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह इतर मान्यवरांनी भेट देऊन गणेशाची आरती केली. या सोहळ्याचे अद्वितीय दृश्य अनुभवण्यासाठी आलेल्या विदेशी पर्यटकांशी त्यांनी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या निर्माल्यापासून खतनिर्मिती उपक्रमाला भेट देऊन या उपक्रमाचा आज शुभारंभ केला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमात १० हजार श्रीसाधकांचा सहभाग आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, पर्यावरण रक्षणाच्या दिशेने हे सकारात्मक पाऊल आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण’ योजनेमुळे राज्यातील भगिनींचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे असे सांगून राज्यातील शेतकऱ्यांचे कल्याण आणि समृद्धी हीच सरकारची प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “बळीराजावरील संकट टळावे आणि शेतकरी सुखी व्हावेत” अशी प्रार्थना त्यांनी आज गणरायाच्या चरणी केली.