मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास महायुती घाबरते; जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार….; नाना पटोलेंची खोचक टीका

0
51

मुंबई, दि. २० (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्ष जागावाटप अंतिम करून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यावर भर देत आहेत. महाविकास आघाडीत १५ जागांचा तिढा अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत असून, महायुतीत २० ते २५ जागांचा अपवाद वगळता उर्वरित जागांच्या वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्याचे समजते. यातच काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा महायुतीवर जोरदार टीका केली आहे.

महायुतीचा चेहरा कोण आहे त्यांनी जाहीर करावे, असे आम्ही सातत्याने विचारत होतो. पण, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास ते घाबरले आहेत. भ्रष्ट महायुती सरकारने महाराष्ट्र विकायला काढला असून जमिनी विकत आहेत. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि योजना दूतच्या नावाखाली जनतेच्या पैशावर हे सरकार भाजपाचा प्रचार करत आहे. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर योजनादूतसह सरकारने घेतलेले अनेक निर्णयही रद्द केले आहेत, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला.

पांचज्यन या आरएसएसच्या मुखपत्रात बाबा सिद्दिकींचा कुख्यात माफिया दाऊदशी संबंध जोडल्याच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, देशभरातील कोणताही गुन्हेगाराने भाजपात प्रवेश केला तर ते स्वच्छ होतात व संघ संघटनाही त्यांचे स्वागत करते. ज्यांच्याविरोधात गाडीभर पुरावे होते ते भाजपात आले, ज्यांना चक्की पिसिंग करणार होते त्यांना भाजपात घेतले त्यावर संघ काहीच बोलला नाही. भाजपा सरकारबरोबर बाबा सिद्दिकी आले, एकनाथ शिंदे आले व ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी संघ का बोलला नाही. आता बाबा सिद्दिकींची हत्या झाल्यानंतर त्यांचा दाऊदशी संबंध दाखवण्याचा प्रयत्न ते का करत आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नबाव मलिक यांच्यावरही भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याच नवाब मलिक यांचे मतदान भाजपाला चालते. भाजपाचे व संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी केली