“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दलित अत्याचारांबाबत दीपक केदार यांचा गंभीर आरोप”

0
9

परभणी, दि.26 (पीसीबी) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दलित बहुजनांचा तिरस्कार आहे का? कारण गेली दहा वर्ष झालं त्यांनी एकदाही एकाही दलित अत्याचार झालेल्या ठिकाणी भेट दिली नाही असा आरोप ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी केला. देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा ते गृहमंत्री होतात तेव्हा तेव्हा कायदा सुव्यवस्था बिघडून दलितांवर हल्ले कसे काय होतात? असा सवालही त्यांनी केला. दीपक केदार यांनी परभणीतील दिवंगत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत बीड आणि परभणी घटनांवरून राज्य सरकारवर आरोप केले.

दीपक केदार म्हणाले की, परभणी प्रकरण हे रमाबाई आंबेडकरनगर गोळीबार सारखं प्रकरण आहे. मनोहर कदमच्या भूमिकेत अशोक घोरबांड होता. जवळपास दहा जणांच्या हत्याकांडाचे षडयंत्र असावे. मनोहर कदमला शिक्षा झाली असती तर हा घोरबांड निर्माण झाला नसता. आम्हाला शंका आहे की घोरबांडला कर्मठ हिंदुत्ववादी संघटनानी ट्रेनिंग दिले असावे. त्याची जातीयवादीवृत्ती ही एखाद्या संघटनेशी जोडल्या सारखी आहे. त्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे.

सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू
परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर बंद पुकारण्यात आला होता. या बंददरम्यान काही समाजकंटकांनी हिंसक आंदोलन केले ज्यामुळे पोलिसांनी धरपकड केली. या कारवाईत 35 वर्षीय तरुण वकील सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. न्यायालयीन चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावरील जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. पोलीस कोठडीतून ते जेव्हा एमसीआरमध्ये गेले. तेव्हा सूर्यवंशी यांना जळजळ होत होतं. तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

सोमनाथच्या कुटुंबीयांचे आरोप
जोपर्यंत त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मीडिया समोर पुरावे द्यावेत अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सोमनाथला वेगवेगळ्या आजार होते. त्याला कुठलाही आजार नव्हता. माझा मुलगा कुठेही सहभागी नव्हता. त्याला निर्घृणपणे पोलिसांनी मारले. जोपर्यंत त्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमच्या समाधान होणार नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पुरावे द्यावेत की आमचा सोमनाथ कुठे होता? त्यांनी कोणाला दगड मारले? कुणाचं काही जाळपोळ केली का? विनाकारण आमच्या मुलाला मारले. त्यामुळे जोपर्यंत ही चौकशी तात्काळ होत नाही दोष अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नसल्याची प्रतिक्रिया सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.