मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भंडारा डोंगर भेटीचे निमंत्रण

0
286

 ‘रिंगरोड’मध्ये बदल केल्याने मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई, दि.17 (पीसीबी)- भंडारा डोंगराला भेदून जाणा-या रिंगरोडमध्ये बदल केल्याबाबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे, विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आभार मानले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांना भंडारा डोंगराला भेट देण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही तत्काळ भेट देण्याची ग्वाही दिली.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने भंडारा डोंगरावर श्री संत तुकाराम महाराजांचे जागतिक किर्तीचे भव्यदिव्य मंदिर साकारले जात आहे. तुकाराम महाराजांचे सर्वात मोठे शिल्प उभारले जाणार असून मंदिराचे काम वेगात सुरू आहे. मंदिराच्या कामाची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली. तसेच डोंगरावर दशमी सप्ताह मोठा भरला जातो. त्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी भंडारा डोंगराला भेट देण्याचीही विनंती केली.

‘रिंगरोड’मध्ये बदल केल्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मानले आभार –

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रस्तावित केलेला 110 मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून जात होता. डोंगराला बोगदा करण्यास वारक-यांचा, संस्थानचा तीव्र विरोध होता. वारक-यांच्या भावना लक्षात घेता भंडारा डोंगराला भेदून जाणा-या रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याची आग्रही मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्याबाबत संस्थांनच्या पदाधिका-यांना सोबत घेवून शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने रिंगरोड भंडारा डोंगराच्या बाजूने घेण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानल्याचे बाळासाहेब काशिद यांनी सांगितले.