मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर काय म्हणाले एकनाथ फडणवीस

0
229

मुंबई , दि. ३ (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या धमकीची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसह इतर बाबींवर गृहविभागाची नजर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली होती. चौकशीअंती त्याची सुटका करण्यात आली आहे.

धमकीप्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा परिसरातून लोणावळा पोलिसांनी ३६ वर्षीय अविनाश अप्पा वाघमारेला ताब्यात घेतलं होतं. मूळचा घाटकोपर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील साठे चाळीतील रहिवासी असलेल्या वाघमारेने धमकीचा फोन केला होता. लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवरुन दारूच्या नशेत असताना वाघमारेचा हॉटेल मालकाशी वाद झाला होता. या वादानंतर हॉटेल मालकाला त्रास देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या १०० या आप्तकालीन क्रमांकावर वाघमारेने फोन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठी कट रचला जात असल्याची बनावट माहिती दिली होती.

याप्रकरणी अविनाश वाघमारेविरोधात पोलीस यंत्रणा आणि हॉटेल चालकाला त्रास दिल्याबद्दल कलम १७७ अंतर्गत लोणावळा पोलीस स्थानकामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “मला धमक्यांचे अनेकदा फोन आलेले आहेत. या धमक्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी जनतेतला माणुस आहे. मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया या धमकीवर मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात महिनाभराआधी धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर धमकीचा फोनदेखील आला होता. पंढरपुरातील आषाढी वारीच्या वेळीही मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काही दिवसांपूर्वी नक्षल्यांकडूनही मुख्यमंत्र्यांना धमकी देण्यात आली होती.