मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मावळात; एकवीरा आईचे घेणार दर्शन

0
114

गडावरील विविध 39.43 कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पिंपरी, दि. ३ : राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे उद्या (4 ऑक्टोबर) दुपारी मावळ दौऱ्यावर येणार आहेत. कार्ला गड येथील एकवीरा आईचे दर्शन घेणार आहेत. गडावरील पाय-यांची दुरूस्ती, संरक्षण भिंत, मुख्य मंदिराची दुरूस्ती, विश्रांती कक्षाच्या अशा 39.43 कोटी रुपयांचा कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मावळचे शिवसेना खासदार, केंद्रीय ऊर्जा विभागाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीरंग बारणे यांनी दिली.

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला वेहेरगाव येथील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिरात गुरुवारी घटस्थापना झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त कार्ला गडावर एकवीरा देविच्या दर्शनासाठी येत असतात. गडावर येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्याबाबत खासदार बारणे यांनी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्ला गडाचा कायापालट करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) तून 39.43 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदाराला वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

मंदिर, नगारखाना, स्तंभ व समाधी यांचा जीर्णोद्धारासह मंदिर परिसरातील कामे केली जाणार आहेत. मुख्य मंदिर, नगारखान्याची दुरुस्ती, स्तंभ व समाधीचे दगडी बांधकामाची सफाई आणि सांधे भरणी, सद्यस्थितीतील रांग मंडप उतरवून नवीन रांग-मंडप उभारणे, मोकळ्याजागेत बगीचा निर्माण करणे, तिकीटघर व शौचालय बांधणे, डोंगराच्या काठद्याला लागून दगडी पादचारी रस्ता तयार करणे, पाय-यांची दुरूस्ती, संरक्षण भिंत, शौचालय, पार्किंगचे बांधकाम, धबधब्या जवळ तटबंधी दुरुस्ती करून विश्रांती क्षेत्र तयार करणे, पायऱ्यांच्या मध्यंतर येथे दमलेल्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, बाकडे आणि कचरापेट्या बसवणे, भाविक व पर्यटकांच्या माहिती व सुरक्षतेसाठी सुचना फलके बसविण्याच्या कामाचा शुभारंभ होणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला (लोणावळा) गडावरील आई एकविरा देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल जात आहे. देवीचे मंदिर व चौघड्यांला आकर्षक फुलांचे डेकोरेशन करण्यात आले असून गड परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोप-यातून देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गडावर येत आहेत. भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावे. गोंधळ करु नये, उत्सवाला गालबोट लागेल असे कोणी वागू नये. शांतता पाळावी असे आवाहनही खासदार बारणे यांनी भाविकांना केले.