मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार..

0
403

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत औरंगाबाद येथील क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेशानुसार रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर लावण्यास सक्त मनाई आहे. पण शिंदे यांनी या आदेशाचे उल्लंघन केले आहे. शिंदे यांनी आपल्या औरंगाबाद दौऱ्यात क्रांती चौक येथे रात्री 10 नंतर एका सभेला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी लाऊडस्पिकर वरून भाषण केले होते. असा आरोप शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे.

आनंद ज्ञानदेव कस्तुरे यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात याविषयी तक्रार केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ‘शिंदेंनी 31 जुलै रोजी रात्री 10 नंतर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लाऊडस्पीकरवरुन भाषण करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच या ठिकाणी बेकायदेशीर जमावही उपस्थित होता. त्यामुळे पोलिसांनी मुख्यमंत्री शिंदे व या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा,’अशी मागणी कस्तुरे यांनी केली आहे.

पोलिसांनी हा अर्ज स्वीकारला आहे. पण या प्रकरणी अजून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.