नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झाला आहे. भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळात तेच मुख्यमंत्री होतील असा तर्क लावला जात होता. मात्र, शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्रीपदाचा मी निवडणुकीपूर्वीही दावेदार नव्हतो आणि आताही नाही, असं वक्तव्य चौहान यांनी केलं आहे. मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार कधीच नव्हतो. मी केवळ पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष मला कोणतीही जबाबदारी दिली तर ती मी पूर्ण करण्यास तयार आहे, असं ते मंगळवारी एका व्हिडिओमध्ये बोलताना म्हणाले आहेत.
भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशमध्ये सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. भाजपला राज्यात १६३ जागा मिळाल्या आहेत.२३० विधानसभेच्या जागा असणाऱ्या राज्यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दुसरीकडे काँग्रेसला ६६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मागील वेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेससाठी ही मोठी पिछेहाट आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सलग सहाव्यांदा बुधी मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवला आहे. त्यांनी तब्बल १,०४,९७४ मतासंह काँग्रेस उमेदवार विक्रम शर्मा यांचा पराभव केला. दरम्यान, भाजपला राज्यात केलेल्या घोषणा फायदेशीर ठरल्याचं बोललं जातं. चौहान यांच्या लाडली बहना योजनेचा भाजपला फायदा झाला. या योजनेंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते.
भाजपकडून निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. सामूहिक नेतृत्त्वात निवडणूक लढवली जाईल असं भाजपने जाहीर केलं होतं. त्यामुळे भाजप चौहान यांना डावलतंय का अशी चर्चा सुरु झाली होती. आता चौहान यांच्या वक्तव्याने त्याला बळकटी मिळताना दिसत आहे.












































