मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रिमंडळाचा आज विस्तार

0
317

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल झाले आहेत. तर भाजपचे संभाव्य मंत्रीही मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 18 मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिंदे गटाच्या नऊ तर भाजपच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विशेष म्हणजे भाजपचे आणखी 2 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात एक महिला असणार आहे. पण हे दोन जण कोण हे अद्याप समोर आलेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात हालचालीही वाढल्या आहेत. राजभवनातील दरबार हॉल हा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच मंत्रिमंडळ विस्तार होताच पावसाळी अधिवेशन घेण्याच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 17 ते 26 ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे.

भाजपचे 11 जण शपथ घेण्याची शक्यता
दरम्यान आज मंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपतील संभाव्य 9 जणांची नावं समोर येत आहे. पण त्यातही आज भाजपचे 11 जण शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपतील एक महिला आमदार शपथ घेतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्या महिला आमदार कोण? त्याचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवाय 9 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असलं तरी दोन नावांवर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

महिनाभरापासून मंत्रिमंडळाची प्रतीक्षा
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री होणं हा मोठा आश्चर्याचा धक्का मानला गेला. शिंदे-फडणवीसांनी शपथ घेऊन 39 दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांमध्ये राज्यात पावसानं धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. दोघांचंच मंत्रिमंडळ असल्यानं शिंदे आणि फडणवीसांनी काही ठिकाणी दौरे देखील केले. मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यानं आणि मंत्रिमंडळ नसल्यानं म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही, असं म्हणत विरोधकांसह सामान्य जनता देखील सरकारवर टीका करु लागली होती.

शिंदे गटातून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ
1) उदय सामंत 2) दादा भुसे 3) संजय शिरसाट 4) संदीपान भुमरे
5) गुलाबराव पाटील,6) भरत गोगावले 7) शंभूराज देसाई 8) तानाजी सावंत

भाजपकडून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ
1) चंद्रकांत पाटील, 2) राधाकृष्ण विखे पाटील 3) सुधीर मुनंगटीवार 4) गिरीश महाजन 5) सुरेश खाडे
6) अतुल सावे 7) मंगल प्रभात लोढा 8) रवींद्र चव्हाण 9) विजयकुमार गावित