नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) : मुख्तार अब्बास नक्वी यांनी मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अल्पसंख्याक विभागाची धुरा सांभाळणाऱ्या नक्वी यांच्या राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्याच्या आदल्याच दिवशी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून त्यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, देशातील मुस्लिम धर्माचे लोक भाजपावर नाराज असल्याने भाजपाने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे.
आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्वींच्या योगदानाचे कौतुक केले होते. भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवारी यादीतून नक्वींचे नाव वगळण्यात आले होते. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना केंद्रीय मंत्री केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कामकाज पाहू शकतात. मात्र त्याआधीच नक्वींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
उपराष्ट्रपतीपदासाठी रिंगणात?
उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप त्यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा होती, मात्र ती प्रत्यक्षात उतरली नाही. त्यामुळे आता नक्वींना उपराष्ट्रपतीपदासाठी भाजप रिंगणात उतरवण्याची शक्यता वाढली आहे. भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने एनडीएचे उमेदवार म्हणून नक्वींना तिकीट मिळाल्यास यूपीएच्या तुलनेत त्यांचे पारडे जड ठरु शकते.