मुंबई, दि. 13 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील पक्षांचे जागावाटप होत नसल्याने मुंबई वगळता राज्यभरात भाजप स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीतील नेत्यांमध्येच जुंपली, तर त्याचा फटका राज्य सरकार च्या स्थैर्य किंवा कामकाजाला बसू नये, याची सावधगिरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाळगत आहेत. त्यामुळेच त्यांनी मैत्रीपूर्ण लढत झाली, तरी महायुतीतील नेत्यांवर टीकाटिप्पणी नar करण्याचे निर्देश भाजप नेत्यांना दिल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केली असली तरी तीनही पक्षातील नेत्यांमध्ये वाद आहेत आणि इच्छुकांची संख्या मोठी असल्याने जागावाटप करणे शक्य नाही. ठाणे, नवी मुंबईत शिंदे यांना आव्हान देणाऱ्या मंत्री गणेश नाईक यांना भाजपने ठाणे जिल्हा निवडणूक प्रभारी केले आहे. तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंसह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना पक्षात आणून स्वबळाची तयारी केली आहे.
पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांना रोखण्यासाठी जुळवाजुळव केली आहे. नागपूरमध्ये भाजपची ताकद असल्याने तेथे शिंदे-पवारांशी जमवून घेतले जाणार नाही. तर नाशिक, कोल्हापूर, सांगली, जळगाव येथे महायुतीतील पक्षांचे नेते व मंत्र्यांमध्ये भांडणे असल्याने तेथे एकत्र लढणे शक्य नाही. कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण व नितेश राणे आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यात मतभेद आहेत. तर रायगडमध्ये सुनील व आदिती तटकरे, शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात जुंपली आहे. भाजपने बहुतांश महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये अन्य पक्षांमधील नेत्यांना पक्षात प्रवेश देवून स्वबळाची तयारी केली आहे.
स्वबळावर लढताना सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर येवू नयेत आणि कारभारात अडचणी येवू नयेत, यासाठी फडणवीस प्रयत्नशील आहेत. त्यांच्या आधीच्या कार्यकाळात भाजप-शिवसेना युती सरकार होते. आधीपासूनच असलेल्या मतभेदांमध्ये २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढताना भांडणे वाढत गेली आणि २०१९ मध्ये निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या वेळी युती तुटली. भाजप आता सक्षमपणे सत्तेत असल्याने आणि सहकारी पक्षांच्या कुबड्यांची गरज नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले असले, तरी सरकारला एक वर्षच होत आले आहे आणि अजून चार वर्षे जायची आहेत. भाजपला २०२९ च्या निवडणुका स्वबळावर लढायच्या असल्या, तरी सहकारी पक्षांना तोपर्यंत बरोबर न ठेवल्यास देशभरात भाजपविरोधात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे तूर्तास शिंदे-पवार यांच्या सहकारी पक्षांबरोबर जुळवून घेण्याची भाजपची भूमिका आहे. त्यामुळे महायुतीतील मतभेद टाळण्यासाठी व भांडणे मिटविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीनही पक्षातील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन मंत्र्यांची समन्वय समिती नेमण्याचे भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहेत. स्थानिक पातळीवर कडवट टीका व भांडणे झाल्यास ही समिती समन्वयाचे काम करणार आहे, असे वरिष्ठ नेत्याने सांगितले.













































