– सोन्याचे अंडे देणाऱ्या या कोंबडीवर भाजपचा डोळा
मुंबई, दि. २२ (पीसीबी) : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी ८९ हजार ३५३ कोटींवर गेल्या आहेत. ही रक्कम विविध बँकांमध्ये मुदत ठेवी स्वरूपात ठेवण्यात आली आहे. पालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदतठेवी विविध बँकांमध्ये आहेत. या मुदतठेवींचा लेखाजोखा मुंबई महानगरपालिकेच्या वित्त विभागाने प्रशासकांना सादर केला आहे. दरम्यान, याच कारणास्तव कायम शिवसेनेच्या ताब्यातील या महापालिकेवर भाजपचा डोळा असून सोन्याचे अंडे देणारी ही कोंबडी मिळावी म्हणून केंद्र-राज्य सरकारने पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
वित्त विभागाने विविध बँकांचे व्याजदर मागवून सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये या ठेवी गुंतवल्या आहेत. महानगरपालिकेच्या या मुदत ठेवीमधूनच आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यात येतात. तसेच विविध विकासकामांसाठी कंत्रादारांकडून घेतलेल्या अनामत रकमांचा या ठेवीमध्ये समावेश असतो. महानगरपालिकेचे महसुली उत्पन्न घटल्यामुळे मुदत ठेवींमधील प्रकल्पांसाठी राखीव असलेल्या निधीतून गेल्यावर्षी पाच हजार कोटींची रक्कम काढण्यात आली होती. तर यावर्षीही राखीव निधीतून प्रकल्पांसाठी खर्च करण्यात आला. विविध प्रकल्पांसाठी हा निधी संलग्न करण्यात आला आहे. दरवर्षी या मुदतठेवींमधील कोट्यावधींच्या ठेवी परिणत (मॅच्युअर) होत असतात. तर दरवर्षी नव्याने मुदतठेवी ठेवल्या जातात.