मुंबई, दि. २५ (पीसीबी) – राहुल गांधी यांनी चोर आणि मोदी या शब्दांचा संबंध असल्याचं वक्तव्य केल्याने त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तोच चोर हा शब्द पकडून आता राजकीय नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतून आज मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या कारभाराची चौकशी करणारा कॅगचा अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला. अहवालात पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप आमदारांनी आता ठाकरे गटावर गंभीर आरोप करायला सुरुवात केली आहे. मुंबईचा कोपनान् कोपरा विकून खाल्ला, यांना चोर नाही डाकू म्हणावं, अशी टीका भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे.
फडणवीस यांच्याकडून अहवाल सादर
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात कॅगचा अहवाल सादर केला. मुंबई महापालिकेत तब्बल १२ हजार कोटी रुपयांच्या कामाचे कॅगकडून ऑडिट करण्यात आले आहे. विशेषतः कोरोना काळातील निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका या अहवालातून ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या २ विभागांची जवळपास २० कामं टेंडरशिवाय देण्यात आली आहेत. तर काही कामांचे बजेच विनाकारण वाढवण्यात आली. काही कामे सर्वेशिवाय देण्यात आली आदी गोष्टी अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. निधीचा निष्काळजीपणे वापर झाल्याचं अहवालात आढळून आले आहे. कॅगचा हा अहवाल भाजपच्या पथ्यावर पडणार असून भाजप नेत्यांनी आता महापालिकेत पूर्वी सत्ता असलेल्या शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे.
‘मुंबईचा कोपरान् कोपरा विकला’
भाजप आमदार अमित साटम यांनी ठाकरे गटावर टीका केली. ते म्हणाले, या देशात चोराला चोर म्हणणं गुन्हा आहे, असं काल कुणीतरी म्हणालं होतं. पण कॅग रिपोर्टच्या माध्यमातून मुंबईचा खरा चोर, डाकू, खरा लुटणारा कोण आहे, कोपरान् कोपरा विकून खाणार, परदेशात स्वतःच्या प्रॉपर्ट्या घेणारा कोण आहे, हे मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलंय.
लवकरच FIR दाखल होणार…
या सगळ्या भ्रष्टाचार आणि नियमिततेविरोधात एक FIR नोंदवला गेला पाहिजे, अशी मागणी भाजप आमदारांनी विधानसभेत केली आहे. मागणीला गृहमंत्री यांनी सकारात्मक उत्तर दिल्याची माहिती अमित साटम यांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी मुंबईला टार्गेट केलं जातंय, असं वक्तव्य केलं. त्यावर अमित साटम यांनी जोरदार उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘ मुंबई सगळ्यांची आहे. मुंबई ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. नालेसफाई, रस्ते, विविध कामात घोटाळे झाल्याचे आरोप आहेत. त्यामुळे महापालिकेच्या काही कारभाराची सँपल टेस्ट झाली. त्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त कामात भ्रष्टाचार झाल्याचं दिसून आलंय. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है… गेल्या २५ वर्षात मुंबईला ज्या प्रकारे लुटलं, याची तुम्हाला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.