मुंबई, दि.१४ (पीसीबी)- एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे 40 आमदार फुटल्याने शिवसेनेला खिंडार पडलं. या सर्वात मोठ्या बंडाळीमुळे शिवसेना दुभंगलेली पाहायला मिळत असताना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसनेचे नगरसेवक देखील शिंदे गटात सामील झाले.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू असताना परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संकटात संधी शोधत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला आपला झेंडा फडकवण्याची संधी आहे, असं म्हणत पवारांनी मुंबई महापालिकेतील त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची आणि मुंबई विभागीय कार्यकारिणीची आढावा बैठक बुधवारी पार पडली. यावेळी शरद पवारांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाध्यक्षांना व कार्याध्यक्षांना तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर मुंबईत मला कोणत्या वॉर्डमध्ये न्यायचं कार्यकर्त्यांनी ठरवा. मी यायला तयार आहे, असंही पवार म्हणाले.