मुंबई महापालिका ठाकरे गटासाठी सोपी नाही

0
57

मुंबई, दि. 29 (पीसीबी) : विधानसभा निवडणुका आता झाल्या असून, सर्व राजकीय पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेत. बृहन्मुंबई महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर आपलाच झेंडा असावा, यासाठी आता सर्वच पक्ष धडपड करताना दिसून येताहेत. अशातच मुंबईतील 36 पैकी अनेक जागांवर महायुतीचे आमदार निवडून आल्याने मागील 25 वर्षांहून अधिकचा काळ महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई होणार असल्याचं म्हटलं जातंय.

माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेशाची शक्यता : विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या दणदणीत विजयाचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर निश्चितच होईल, असे अंदाज व्यक्त केले जाताहेत. विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची झालेली पीछेहाट आणि भाजपा-शिवसेना शिंदे गटाला आलेलं मोठं यश हे येत्या महापालिका निवडणुकीत परिणामकारक ठरणार आहे. तसेच अनेक माजी नगरसेवकदेखील येत्या काही दिवसांत महायुतीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसेच काँग्रेसचे अल्पसंख्याक नेते आणि माजी नगरसेवक वगळता इतर नगरसेवक हे भाजपा किंवा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांची थांबलेली गळती पुन्हा एकदा सुरू होण्याचा अंदाज: बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा पराभव करण्यासाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने दीड ते दोन वर्षांपूर्वीच तयारी सुरू केल्याचे दिसून येतंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा बडे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत होते, त्याचवेळी मुंबईतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात वर्षा बंगल्यावर प्रवेश करीत होते. शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेना ठाकरे गटाचे जवळपास 40 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलाय. यातील अनेक माजी नगरसेवकांना विकासकामांसाठी घवघवीत निधीदेखील मिळाल्याचं बोललं जातंय. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि काँग्रेसमधील माजी नगरसेवकांच्या गळतीला लोकसभा निवडणुकीनंतर काहीसा ब्रेक लागल्याचं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त करता आलंय, त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांनी पक्षांतराचा निर्णय मागे घेतल्याचं म्हटलं जातंय. पण आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत असल्याने नगरसेवकांची थांबलेली गळती पुन्हा एकदा सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि माजी नगरसेवक रवी राजा यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय.

नगरसेवकांचा निवडून आल्यानंतर शिवसेनेत प्रवेश : मागील चार वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. 2021 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपला. त्यानंतर निवडणूक झालेली नाही. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत पालिकेतील एकूण 227 जागांपैकी शिवसेनेला 84 जागा जिंकता आल्या होत्या. भाजपाने 82 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस 31 जागांवर, राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले होते. यात मनसेचेदेखील 7 नगरसेवक होते. मात्र, या नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केलाय. याच निवडणुकीत समाजवादी पक्षाचे एक नगरसेवक आणि अपक्ष 14 नगरसेवक निवडून आले होते. मागील 25 वर्षांहून अधिक काळ मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळेच महानगरपालिकेत शिवसेनेचा प्राण असल्याचं बोललं जातंय. एक वेळ राज्यात सत्ता मिळाली नाही तरी चालेल मात्र पालिकेवर सत्ता कायम राहिली पाहिजे ही शिवसेनेची सुरुवातीपासूनची भूमिका राहिली आहे. मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीने शिवसेनेने पालिकेतील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय. मात्र, पक्ष फुटल्यानंतर मुंबईतील चित्र मात्र पूर्णपणे बदललंय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई असणार असल्याचं म्हटलं जातंय.

निवडून आलेले सर्वाधिक आमदार मुंबईतील : यासंदर्भात आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत केली असता त्या म्हणाल्या की, निश्चितच ही निवडणूक आमच्यासाठी अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. मात्र, मुंबई शिवसेनेची आहे आणि आम्ही मुंबईचे आहोत. त्यामुळे निश्चितच आम्हाला आगामी पालिका निवडणुकीत विजय मिळेल. लोकसभा निवडणूक किंवा आता विधानसभा निवडणूक असू द्या, आम्हाला मिळालेल्या जागा या मुंबईत जास्त आहेत. आतासुद्धा आमचे जे काही आमदार निवडून आलेत त्यातील सर्वाधिक आमदार हे मुंबईतील आहेत. माहीममध्ये महेश सावंत, भायखळ्यात मनोज जामसुतकर यांचा विधानसभा निवडणुकीत विजय होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र, आम्ही सतत सांगत होतो की हे आमचे गड आहेत आणि निकालात तेच दिसलं. हाच निकाल तुम्हाला महापालिका निवडणुकीत देखील दिसेल. राहिला प्रश्न नगरसेवकांच्या पक्षांतराचा तर ज्यांना सत्ता खुणावते ते जातील, गेले ते कावळे राहिले ते मावळे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सुद्धा महानगरपालिकेवर आमचाच झेंडा असेल यात कोणतीही शंका नाही, असंही त्या म्हणाल्यात