मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उचलबांगडीचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

0
227

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयुक्त इक्बाल सिंह यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने फक्त मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले नाहीत तर देशातील 6 राज्यांच्या गृह सचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी त्यांच्या X अकाउंटवरुन व्हिडीओ ट्वीट केलाय. या व्हिडीओत त्यांनी इक्बाल सिंह चहल यांची बदली झाल्याची माहिती दिली आहे. “निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची ताबोडतोब बदली करण्यात यावी, असे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. मी त्याचे स्वागत करत आहे”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून आयुक्त चहल यांची बदली होत नव्हती. निवडणूक आयुक्तांनी राज्य सरकारला तीन वेळा पत्र व्यवहार केला मात्र, त्याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले होते. १९८९ च्या आयएएस बॅचचे वरिष्ठ अधिकारी म्हणून असलेल्या चहल यांनी ठाणे जिल्हाधिकारी पदावरही काम केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवडिच्या कोस्टल रोड चे कामात त्यांचा मोठा वाटा होता.