पिंपरी, दि. २६ : पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई बंगळुरू महामार्गावरील महत्त्वाच्या टप्प्यातील वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि किवळे परिसरातील सेवा रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. या पार्श्वभूमीवर देहूरोड ते खेड शिवापुर टोलनाका या सेवा रस्त्याच्या अंतर्गत तब्बल 321 कोटींचे कामाला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी मंजूरी दिली. यानंतर आमदार शंकर जगताप यांनी या सेवा रस्त्यावरील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा धडाका लावला आहे. याच अंतर्गत पुनावळे , ताथवडे या भागातील डांबरीकरणाची कामे पूर्ण झाली असून थेट भुमकर चौकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. या कामांची सातत्याने पाहणी सुरू असून, वेळोवेळी आमदार जगताप यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. या सुसज्ज सेवा रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी पासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच हिंजवडीतील आयटीयन्सची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार असल्याचा विश्वास आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई बंगळुरू महामार्गावर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (मॉर्थ), राज्यशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अख्यारीत असलेल्या सेवा रस्त्यांचा समावेश आहे. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिका रस्ते विकासाचे काम करू शकत नाही. त्यामुळे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, तांत्रिक व्यवस्थापक अंकित यादव, कार्यकारी अभियंता सुभाष घंटे, समन्वयक विनोद पाटील या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निर्देश देत मुंबई बंगळुरू महामार्गावरील सेवा रस्त्यांचा प्रश्न निकालात काढण्याचा धडाका आमदार शंकर जगताप यांनी लावला आहे. याच अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 चा सेवा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. याच अंतर्गत पवना नदी ते पुनावळे अंडरपास आणि पुनावळे अंडरपास ते ताथवडे अंडरपास पर्यंतचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. हे काम आता थेट भूमकर चौकापर्यंत होणार आहे.
आयटी कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडी पासून मुक्तता
वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत आणि किवळे या 9.7 किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 12 मीटर रुंद डीपी रस्त्याचे कामही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हातात घेतले आहे. तेही या कामाबरोबर सुरू असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले . पुनावळे अंडरपास ते ताथवडे अंडरपास पर्यंतचे डांबरीकरण पूर्ण झाल्यामुळे हिंजवडी भागातून येजा करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुनावळे, ताथवडे या परिसरातील रहिवासी तसेच याच भागातून हिंजवडी आयटी परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या सेवा रस्त्यांचा उपयोग मुख्यत्वे हिंजवडी आयटी पार्क मध्ये ये- जा करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांना होणार आहे
सेवा रस्त्यांचे काम प्रगतिपथावर
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मुंबई बंगळूर महामार्गाच्या वाकड ते मामुर्डी या भागातील सेवा रस्त्यांसाठी आमदार शंकर जगताप यांनी मोठा पाठपुरावा केला आहे याच अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बारा मीटर रुंद डीपी रस्त्याचे कामही सुरू केले आहे. मुख्य म्हणजे देहू रोड ते खेडशिवापूर टोल नाका असा हा सेवा रस्ता असून तब्बल 321 कोटी या कामासाठी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहेत.
ताथवडे, पुनावळे, रावेत, वाकड परिसराची देखील झपाट्याने वाढ झाली आहे. या परिसरात अनेक आयटी कंपन्या व मोठ्या रहिवासी सोसायटी आहेत. त्यातच हा परिसर हिंजवडी आयटी पार्कला लागून असल्याने नागरिक या परिसरात वास्तव्यास पसंती देत आहेत. येथे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना पुनावळे, ताथवडे, वाकड येथील सब वे, मुंबई बेंगलोर हायवे, लगत असणारा सर्व्हिस रस्ता सुसज्ज आणि वेगवान करून देण्यासाठी प्राधान्याने काम केले जात आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत या कामांना मार्गी लावले आहे. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना अंतिम टप्प्यात आहेत. पुढील 50 वर्षाचे “व्हिजन” या कामांसाठी देण्यात आले आहे, असे आमदार शंकर जगताप यांनी सागितले.










































