दि.०४(पीसीबी)-मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या या द्रुतगती महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. अपघाताला १५ तास उलटले तरी अजून या मार्गावर वाहतूक सुरळीत होऊ शकली नाही. मंगळवारी, (३ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील गॅस वाहतूक करण्याऱ्या टँकरचा अपघात झाला होता. अपघातानंतर गॅसची गळती सुरू झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. द्रुतगती महामार्गासह जुना पुणे-मुंबई मार्ग बंद असल्यामुळे २५ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
१७ तासांपासून कोंडी
गेल्या १७ तासांपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. बुधवारी (४ फेब्रुवारी) या महामार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.आडोशी बोगद्याजवळ पलटी झालेला टँकर काढण्यास प्रशासनाला अजुनही यश आले नाही. त्यामुळे या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक रोखल्यामुळे तिथेही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईला जाण्यासाठी ताम्हिणी घाटातील रस्ता वापरला जात आहे. पुढे आणखी किती वेळ या प्रक्रियेला लागेल हे सांगता येणार नाही.
पर्यायी मार्ग कोणते?
खोपोलीजवळ झालेल्या अपघातामुळे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. गुगल मॅपवर या मार्गावर पूर्णपणे ब्लॉक दाखवण्यात येत आहे. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट टप्प्यात, किलोमीटर ४१ (मुंबई लेन) येथे गॅस टँकर उलटल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे आज मुंबई–पुणे तसेच पुणे–मुंबई या दोन्ही दिशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.
पर्यायी मार्ग:
१) चांदणी चौक – ताम्हिणी घाट – रायगड मार्गे मुंबई (पुणे-पिरंगुट-पौड-मुळशी-ताम्हिणी घाट- वरचीवाडी-साजे-नांदगाव-पाली-पेडली-दुरशेत-उंबारेनंतर पुढे पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग)२) आळे फाटा – माळशेज घाट – ठाणे मार्गे मुंबई
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील झालेल्या अपघातातील वाहन हटवण्याचे काम सुरू आहे. या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे, अशी माहिती खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिली आहे. पुणे-मुंबई दरम्यानच्या प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
१५ तासांपेक्षा जास्तीचा काळ उलटूनही या मार्गावरील अपघातग्रस्त वाहन हटविण्यात आले नाही. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सुरक्षेच्या कारणास्तवर महामार्गाची एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. काही कॅन्सरग्रस्त रुग्णही या वाहतूक कोंडीत अडकले आहेत. महामार्गावर पाणी, अन्न आणि शौचालयाची सुविधाही अपुरी असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.
रुग्णालयात पोहचायला उशीर
एक प्रवासी म्हणाला, मी लातूरहून आला आहे. माझ्या मित्राला कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णालयात न्यायचं आहे. आज सकाळी आठ वाजता आम्हाला रुग्णालयात पोहचायचं होतं पण मोठ्या वाहतूक कोंडीमुळे मी पोहचू शकलो नाही. पहाटे चार वाजल्यापासून इथे कोंडीत अडकलो आहे. उशीर झाल्याने मित्राच्या उपचारावर परिणाम होणार आहे.
पिण्यासाठी पाणीही नाही
संबंधित प्रशासन आणि यंत्रणा झोपली आहे का? महामार्गावर झालेल्या कोंडीत अनेक रुग्ण, शासकीय कामांसाठी जाणारे अधिकारी, सामान्य नागरिक अडकले आहेत. त्यांनी काय करायचं? इथं खाण्यासाठी काहीही नाही तसेच पिण्यासाठी पाणीही नाही. कोंडीत अडकल्याने लहान मुलांचीही मोठी गैरसोय झाली आहे, असंही एका प्रवाशाने सांगितले.









































