मुंबई गिळण्याचं गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान – संजय राऊत

0
180

धारावीत सर्वात मोठा टीडीआर घोटाळा

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – धारावी पूनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे गेल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यांनी याविरोधात आज मोर्चाचे आयोजन केले असून धारावीतून हा मोर्चा थेट अदानींचे मुख्यालय असलेल्या बीकेसीतील कार्यालयाजवळ जाणार आहे. याप्रकरणी आज संजय राऊतांनीही मोठा आरोप केला. धारावी पूनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा असल्याचं संजय राऊत म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“धारावी प्रकल्प हा या देशातील सर्वात मोठा घोटाळा होताना आम्हाला दिसतोय. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा या देशातील टीडीआर प्रकल्प आहे. आणि धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचं गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान आहे. गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे”, असा आरोप संजय राऊतांनी केला.

“भाजपाचे जावई गौतम अदानी आणि त्यांची कंपनी यांना संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावावरच केला आहे असा तो प्रकल्प केला आहे. धारावीतील गरीब लोकांना घर आणि व्यवसाय आहेत त्या तिथेच जागा मिळायला पाहिजेत. पण हा प्रकल्प सरकार का करत नाही. सरकारने जॉइन्ट वेंचरमध्ये प्रकल्प करावा”, असंही राऊत म्हणाले.

मुंबई विकण्याचा प्रयत्न
“गुजरातमध्ये गेल्या काही काळात सातत्याने ड्रग्स उतरतंय आणि ते ड्रग्स महाराष्ट्रात येतंय. आणि अख्खी धारावी अशा लोकांच्या हातात देणार असतील तर अख्ख्या मुंबईत ड्रग्सचा व्यापार करायचा आहे का अशी शंका आहे. धारावीच्या पोरांना ड्रग्सच्या पुड्या विकायला द्यायच्या आहेत का? धारावीतील जनतेच्या तोंडाला पाने पुसून आवळा धरून कोवळा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई विकण्याचा हा प्रयत्न आहे. देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा कुठे होत असेल तर तो धारावीत पुनर्विकास प्रकल्पात होत आहे”, असा घणाघाती आरोपही संजय राऊतांनी केला.

बचाव समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न
“हा मोर्चा निघू नये म्हणून दिल्लीतील वरिष्ठ स्तरावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव आला. धारावीतील जनतेची मुस्काटदाबी करण्यासाठी पोलिसांवर, प्रशासनावर दबाव आणला. हा दबाव मोडून आम्ही हा मोर्चा काढत आहोत. कारण आम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र वाचवायचा आहे. सरकारने आंदोलनात फूट पाडण्याचा नेहमीचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीत फूट पाडली, शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. धारावी बचाव समितीची पत्रकार परिषद झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडले तसंच धारवी बचा समितीची माणसं फोडली. बचाव समितीतील काही लोक सरकारला सामील झाले असतील. म्हणजे अदानींना सामील झाले. ते कसे माणसं विकत घेतात हे माहितेय”, असा आरोपही त्यांनी केला.

तेच लोक महाराष्ट्राचा सौदा करू शकतात
“ज्यांचं महाराष्ट्राच्या निर्मितीत, महाराष्ट्राच्या लढ्यात शुन्य योगदान आहे, असेच लोक महाराष्ट्राचा असा सौदा करू शकतात. धारावीत श्रमिक, मजूर, कामगार राहतात. हा त्यांना फसवण्याचा प्रकार आहे”, असंही राऊत म्हणाले.