मुंबई क्राईम ब्रँच मधून बोलत असल्याचे सांगत 19 लाखांची फसवणूक

0
83

चिखली, दि. 12 जुलै (पीसीबी) – तुमच्या नावाचे पार्सल इराण येथे जात असून त्याबाबत मुंबई गुन्हे शाखेत तक्रार आल्याचे सांगत पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्याच्या बहाण्याने 19 लाख 11 हजार 741 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 26 जून रोजी चिखली येथे घडली.

याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9823053649, क्रमांक धारक आणि जन स्मॉल फायनान्स बँकेचा खाते क्रमांक 3509020001099582 धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीस फोन करून तो फेडेक्स कुरिअर मधून अजय मारो बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाने 20 जून 2024 रोजी बुक केलेले पार्सल मुंबई ते इराण जात आहे. त्या पार्सल मध्ये दोन किलो कपडे, एक लॅपटॉप, पाच क्रेडिट कार्ड, 25 एलएसडीचे स्ट्रीप आहेत. हे पार्सल मोबीन तेहराणी याने तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून पाठवले असल्याचे फोनवरील व्यक्तीने सांगितले. तसेच हे पार्सल जर तुम्ही पाठवले नसेल तर याबाबत मी मुंबई गुन्हे शाखेत एनसीबीकडे तक्रार केली आहे, असेही फोनवरील व्यक्तीने सांगितले.

त्यानंतर फिर्यादीस मुंबई गुन्हे शाखेच्या एनसीपी कडून फोन आल्याचे भासवण्यात आले. फिर्यादीला स्काईप ॲपवरून संपर्क करून आरोपींनी त्यांचे बनावट ओळखपत्र पाठवून ते पोलीस असल्याचे भासवून दिले. त्यानंतर फिर्यादी यांचे आधार कार्ड घेऊन त्यांना पोलीस क्लियरन्स सर्टिफिकेट देण्याचा बहाणा केला. त्यानंतर आधार कार्डचा गैरवापर करत फिर्यादी यांच्या नावाने जन स्मॉल फायनान्स बँकेकडून इन्स्टंट प्री अप्रूव्हलोन मंजूर करून घेत फिर्यादीची 19 लाख 11 हजार 741 रुपयांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.