- मधुकर भावे
आज वेगळ्या विषयावर लिहित आहे. क्रिकेट हा लहाणपणापासूनच माझा आवडीचा खेळ आहे. पुढे खेळायला सवड मिळाली नाही. पण, या खेळात आणि बँडमिंटनची मला खूप आवड आहे. त्यातील बरेच काही माहिती आहे… ५० वर्षांत अनेक सामने पाहिलेले आहेत. त्यामुळे एक क्रिकेटचा चाहता म्हणून हे निरिक्षण नोंदवित आहे.
सध्या आय.पी.एल.चे सामने सुरू आहेत. पाचवेळा ‘अजिंक्यपद’ आणि तीन वेळा उपविजेता, मुंबईचा ‘मुंबई इंडियन्स’ संघ यावर्षीच्या स्पर्धेत रसातळाला गेला आहे. या मुंबई इंडियन्स संघाची यापूर्वी बाकी नऊ-दहा संघांना खूप भिती वाटायची. धोनीच्या लोकप्रियतेने चेन्नई संघ लोकांच्या मनात रूजला असला तरी… सचिन तेंडूलकरमुळे मुंबई संघाला एक वेगळे तेज होते. गेल्या काही वर्षांत मुंबईचा संघ ढेपाळला. त्या संघाचे मालक अंबानी आहेत. संघाचा कर्णधार हाेता रोहित शर्मा. अचानक सूत्रे फिरली आणि ‘गुजरात टायटन’ संघाचा कर्णधार पांड्याने आपल्या मूळ मालकाला सोडले आणि मुंबई संघात तो दाखल झाला. नुसता दाखल झाला नाही, तर तो कर्णधार झाला. रोहित शर्माला बाजूला करण्यात आले. कसलीही चर्चा न होता हे बदल झाले. कुणी केले, कसे केले… संघाचे मालक अंबानी यांनी याला मान्यता कशी दिली?
सध्या भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव जयेश शहा हे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ते चिरंजीव आहेत. गेल्याच वर्षी गुजरात संघाची बांधणी झाली. त्यापूर्वी गुजरात संघ नव्हता. गेल्यावर्षी अंतिम लढतीपर्यंत गुजरात संघाने धडक दिली. त्यात हार्दीक पांड्या कर्णधार होता. अचानक त्याला ते पद सोडायला कुणी लावले? आणि मुंबई संघासाठी कर्णधार करण्याचा निर्णय कुणाचा? मुंबई संघातील खेळाडूंना याची पूर्वकल्पना होती का? संघातील खेळाडूंशी कर्णधार बदलण्याची चर्चा झाली का? आजपर्यंत त्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. गेल्यावर्षी ५० षटकांचा अंतिम सामना ‘भारत विरुद्ध अॅास्ट्रेलिया’ असा झाला. पहिल्या प्रथमच अंितम सामना अहमदाबादला खेळवला गेला. मुंबईचे महत्त्व कमी करून सामना अहमदाबादला नेला गेला. त्या ५० षटकांच्या सामन्यात भारतीय संघ, आगोदरचे सर्व सामने िजंकला असताना, अंतिम सामन्यातच नेमका हरतो. तो का हरला? त्याच्या खोलात कोणीही गेले नाही. या सगळ्या खेळाच्या मागे कोणते राजकारण आहे का? खेळात राजकारण असावे का? यात सट्टाबाजारवाल्यांचा हात आहे का? एका रात्रीत मुंबई संघ पूर्णपणे ढेपाळतो, हे कसे होते?
मुंबई संघाचा पूर्वीचा कर्णधार रोहीत शर्मा १३ सामन्यात फक्त एकदाच शतक करतो. बाकी सर्व सामने ‘फ्लॉप’ म्हणता येईल, असा त्याचा खेळ. ज्याला ‘कर्णधार’ म्हणून आणले त्या पांड्याचा कोणताही परिणाम जाणवला नाही. कलकत्ताविरुद्धच्या शेवटच्या महत्त्वाच्या सामन्यात पांड्याने काय दिवे लावले ते सर्वांनी पाहिले. पांड्यांला संघात घेवून मुंबई संघाने अपयशाची पायंडी चढायला सुरूवात केली. संघाचा सगळा समतोल बिघडला. क्रिकेट समजणाऱ्या सामान्य प्रेक्षकांना यामागील राजकारण काय आहे, हे पुरेपूर कळले. काही क्रिकेट समालोचकांनी टीकाही केली. पण मुंबई संघाचा मालक असलेल्या अंबानी यांनी पांड्याला ऐनवेळी मुंबई संघात का घेतला? ‘कर्णधार का बदलला’? या प्रश्नाची उत्तरे दिलेली नाहीत. ितकडे गुजरात संघही तळाला गेलेला आहे. तो आता उठत नाही. प्लेअॅाफ स्पर्धेत जाण्याचा विषय संपलेला आहे. कदाचित गेल्यावर्षीचा गुजरात संघाचा जोश राहिला नसल्यामुळे, मुंबई संघाला निकालात काढण्याचा डाव म्हणून पांड्याला गुजरात संघातून फोडण्यात आले नाही ना? जर त्याला कर्णधार केले तर अपेक्षा काय होत्या? मुंबई संघाला तळाला घालण्याची कल्पना होती का? ‘प्ले अॅाफपर्यंत मुंबई संघ पोहोचणार नाही’, ही या मागे योजना होती का? मुंबई संघातील खेळाडंूंना पांड्या कर्णधार म्हणून आल्यामुळे काय वाटते? सूर्या एकदाच का चमकला? ितलक वर्मा प्रभावी फलंदाज असताना सातत्याने का खेळत नाही? असे अनेक प्रश्न वानखेडे स्टेडियमवरील प्रेक्षकांच्या मनात गेल्या दहा सामन्यांनंतर निर्माण झालेले आहेत. त्याची उत्तरे मिळालेली नाहीत.
पांड्याने गुजराचा संघ सोडला आणि गेल्यावर्षी जोरात असलेला गुजरातचा संघ यावर्षी मातीत गेला. मुंबई संघात पांड्या अाला आणि त्याने मुंबई संघालाही मातीत घातले. हे नेमके का घडले? कशाकरिता घडले? कुणी घडवले? पांड्याला गुजरात संघामधून फोडले कुणी? मुंबईचा कर्णधार केले कुणी? या प्रश्नांची उत्तरेच मिळत नाहीत. आणि मुंबई संघाचा बाजार आटोपलेला आहे. पांड्याला फोडण्याचा हा प्रकार मुंबईच्या अंगावर उलटलेला आहे. …
तात्पर्य : खेळ असो, किंवा राजकारण असो… एकदा का फोडाफोडीची लागण झाली की, त्या-त्या संघाचे किंवा पक्षाचे तीन-तेरा झालेच म्हणून समजा. सध्या मुंबई संघाची ती अवस्था आहे.
राजकारणात फोडाफोडीचा काय परिणाम झाला याची उत्तरे ४ जूननंतर मिळणार आहेत.
सध्या एवढेच. 📞9869239977