मुंबई आता भाजपची, मारवाड्यांची…, मराठी बोलायचं नाही, मारवाडीतच बोलायचं…

0
63

मुंबई, दि. 04 (पीसीबी) : मुंबईत आता भाजपची सत्ता आल्याने मराठी बोलायचं नाही, मारवाडीतच बोलायचं असा हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. मराठीत बोलणाऱ्या महिलेवर मारवाडीत बोलण्याची सक्ती या दुकानदाराने केली होती. गिरगावातील खेतवाडीमध्ये ही घटना घडली असून मनसैनिकांनी चोपल्यानंतर त्या दुकानदाराने मराठी माणसांची माफी मागितली आहे. या संबंधित व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

खेतवाडीमध्ये एक मराठी महिला दुकानात गेली असताना त्या दुकानदाराने तिला मराठीत का बोलली म्हणून जाब विचारला. महाराष्ट्रात आता भाजपचं सरकार आहे, असं सांगत त्याने महिलेला मारवाडीमध्ये बोलण्यास सांगितलं. ‘बीजेपी आया है, मारवाडी में बात करनेका. मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का’ असं त्या दुकानदाराने त्या महिलेला म्हटलं.

लोढांनी उद्धट उत्तर दिल्याचा दावा
त्यानंतर संबंधित महिला न्याय मागण्यासाठी भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे गेली. पण लोढांनी तिला उद्धट उत्तर दिल्याचा दावा त्या महिलेने केला. तुम्ही आमच्यात भांडण लावताय असं म्हणत लोढांनी आपल्याला ओळखायलाही नकार दिल्याचं त्या महिलेने सांगितलं.
त्यानंतर त्या महिलेने खेतवाडी मनसे कार्यालयाकडे याची तक्रार केली. तक्रार मिळतात मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या दुकानदाराला बोलावून घेतलं आणि जाब विचारला. त्यावर आपण त्या महिलेला मारवाडीत बोलायला सांगितल्याचं दुकानदाराने मान्य केलं. त्यानंतर मनसैनिकांनी त्याला चांगलाच चोप दिला.

दुकानदाराची माफी
मनसैनिकांनी चोप देताच त्या दुकानदाराने आपली चूक मान्य केली आणि मराठी माणसाची माफी मागितली. पुन्हा आपल्याकडून असं होणार नाही अशी ग्वाहीही त्या महिलेने दिली.
आपल्याच मुंबईमध्ये मराठीत बोलू नका असं सांगितलं जातंय. त्यावर न्याय मागायला आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे गेल्यावर त्यांनी ओळखही दाखवली नाही. उलट उद्धट उत्तर दिलं. आता मराठी माणसाने कुठे जायचं? असा सवाल त्या मराठी महिलेने केला.