मुंबईत ३६ दिवसांत ८२ अल्पवयीन व तरुण बेपत्ता; पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
90

दि.१३(पीसीबी)-मुंबईत अल्पवयीन मुले आणि तरुणांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार, १ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या अवघ्या ३६ दिवसांच्या कालावधीत तब्बल ८२ अल्पवयीन व तरुण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.या एकूण प्रकरणांपैकी ६० जणी मुली असून, २२ मुले बेपत्ता असल्याचे पोलिस नोंदी दर्शवतात. विशेष म्हणजे १८ वर्षांच्या वयोगटातील तरुणींची संख्या सर्वाधिक असून, या वयोगटातील ४१ मुली आणि १३ मुले बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय, ५ ते ११ वयोगटातील लहान मुलांच्याही काही घटना नोंदवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुंबईतील कुरार गाव, वाकोला, पवई, मालवणी आणि साकीनाका या परिसरांतून बेपत्ता होण्याच्या घटनांची संख्या तुलनेने अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही प्रकरणांमध्ये घरातून रागावून निघून जाणे, मित्र-मैत्रिणींच्या प्रभावाखाली घर सोडणे, तर काही घटनांमध्ये मानवी तस्करीचा संशयही व्यक्त केला जात आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक कुटुंबे उशिरा तक्रार दाखल करतात, त्यामुळे शोध मोहिमेला विलंब होतो. प्रत्यक्षात तक्रार वेळेत नोंदवल्यास सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे अधिक सोपे होते.मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही व्यक्ती, विशेषतः अल्पवयीन मूल अचानक बेपत्ता झाल्यास वेळ न घालवता तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवावी. तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास किंवा माहिती मिळाल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

दरम्यान, वाढत्या बेपत्ता प्रकरणांमुळे मुंबईतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे, संवाद वाढवणे आणि परिसरातील हालचालींबाबत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.