मुंबई, दि. १३ : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. तब्बल २३० हून अधिक जागा जिंकत महायुती पुन्हा एकदा सत्तेवर आली. या निवडणुकीत राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (उबाठा) पक्षाची धूळधाण उडाली. यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली. दोन्ही भाऊ संकटात आहेत. ठाकरे ब्रँडच संकटात आहे. त्यामुळे दोघे एकत्र येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. यानंतर आता ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी नवी मोहीम सुरु करण्यात आली आहे. मराठी सेनेचे मोहनिश राऊळ यांनी ‘बंधू मिलन’ कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
मोहनिश राऊळ यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी ‘बंधू मिलन’ कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका त्यांनी शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ठेवली आहे. या कार्यक्रमाचं आयोजनही स्मृतीस्थळावरच करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला येण्याची विनंती दोन्ही ठाकरेंना केली जाणार आहे. या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार का, याबद्दल उत्सुकता आहे.
पुढीस काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेची शेवटची निवडणूक २०१७ मध्ये झाली. २०२२ मध्ये निवडणूक अपेक्षित होती. पण ती अद्याप झालेली नाही. मुंबईत दोन्ही ठाकरेंची ताकद आहे. त्यामुळे मुंबईत युती करुन दोन्ही बंधू ठाकरे ब्रँड शाबूत ठेवणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महायुतीची ताकद बघता त्यापुढे ठाकरे स्वतंत्र लढल्यास त्यांचा निभाव लागणं अवघड आहे.
निमंत्रण पत्रिकेत नेमकं काय?
भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा आयुष्याच्या प्रत्येक सुखदु:खाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार.
बंधू मिलन कार्यक्रम दिनांक ३० मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे.
मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल.