मुंबईत धक्कादायक प्रकार! ICU मधील महिलेचा हात उंदराने कुरतडला;आरोग्यव्यस्थेवर प्रश्नचिन्ह

0
2

दि.१६(पीसीबी)-मुंबईजवळील मीरा-भाईंदर शहरातील पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या एका ८९ वर्षीय महिलेचा हात चक्क उंदराने कुरतडल्याची घटना घडली, आणि आता त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला १२ मार्च रोजी प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील आयसीयू विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

दरम्यान, रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. महिलेला भेटण्यासाठी सकाळी सुमारे ६ वाजता नातेवाईक आयसीयूमध्ये गेले असता एक उंदीर तिच्या हाताजवळून पळून जाताना दिसला. त्यावेळी महिलेच्या हाताला गंभीर जखम झाल्याचे लक्षात आले.

विशेष म्हणजे, आयसीयू सारख्या संवेदनशील विभागात रुग्णांवर सतत लक्ष ठेवले जाणे अपेक्षित असते, मात्र रात्रभर ही बाब डॉक्टर किंवा नर्स यांच्या निदर्शनास न आल्याने रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच आज सायंकाळी संबंधित महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईक आणि नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, यापूर्वीही राज्यातील काही रुग्णालयांमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्याने रुग्णालयांच्या स्वच्छता आणि सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत