दि . १३ ( पीसीबी )– देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दोन दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा धमकीचा मेल आला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा धमकीचा मेल आला आहे. महाराष्ट्र नियंत्रण पोलिस कक्षाकडून मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. राज्यात कुठेही दुर्लक्ष करू नका, तसेच सोमवार ते बुधवारदरम्यान सतर्क राहण्याचा इशाराही या मेलमधून देण्यात आला आहे. तसेच हा मेल कोणी केला याचा तपास सध्या सुरू करण्यात आला आहे.
याबाबतची अधिकची माहिती अशी की, राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा धमकीचा मेल आला आहे. तीन दिवसांत राज्यात किंवा राज्याच्या बाहेर कुठेही हा बॉम्ब ब्लास्ट होईल असे या मेलमध्ये म्हटले आहे. हा मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांना यचीह माहिती देण्यात आली असून पोलिसांकडून हा मेल कोणी पाठवला याचा तपास केला जात आहे. सोमवार ते बुधवार सतर्क राहण्याच्या सूचना देखील या मेलमधून देण्यात आल्या आहेत.
हा धमकीचा मेल नेमका कोणी पाठवला आहे, कोणी खोडसाळपणा केला आहे का, निनावी मेल आहे का, या अनुषंगाने मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. परंतु अद्यापही पोलिसांना याबाबत काही सापडले नाही. मुंबई पोलिसांना अशा प्रकारचे धमकीचे मेल यापूर्वी देखील अनेकवेळा आले आहेत. तसेच खोडसाळपणा करत धमकीचा मेल करणाऱ्यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे, तर काहवेळा दारूच्या नशेत असे मेल करणाऱ्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. त्यानुसार आता या मेलची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. तसेच आरोपीचा शोध लागल्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, सध्या देशात भारत पाकिस्तान युद्ध सदृश परिस्थितीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली असली तरी देखील सीमावर्ती भागांमध्ये तणाव अद्यापही आहे. अनेक भागांमध्ये शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच मुंबईत देखील राज्य सरकारची सुरक्षेच्या अनुषंगाने काल महत्त्वाची बैठक देखील पार पडली होती. मुंबईसह महाराष्ट्रात सुरक्षेच्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.