मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार

0
175

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – सर्वत्र राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह असून या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसने राम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण न स्वीकारल्याने काही राज्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवत राजीनामा दिला. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याचं दिसते आहे. कारण माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

रविवारी सकाळी मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत अधिकृत माहिती दिली. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर रविवारी त्यांनी शिक्कामोर्तब केला. ते म्हणाले की, आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपवत आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.

दरम्यान, १० माजी नगरसेवक आणि २५ पदाधिकाऱ्यांसह देवरा शिंदेंसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून दक्षिण मुंबईतून उमेदवारीचं आश्वासन देण्यात आलं नाही. त्यामुळं आगामी काळात या जागेवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच होऊ शकते. तसेच राज्यसभेवर देखील मिलिंद देवरा यांना पाठवलं जाऊ शकतं असंही बोललं जात आहे. ते आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

दक्षिण मुंबईतून लोकसभेसाठी ठाकरे गटाचे अरविंद सावंत इच्छुक आहेत. विद्यमान खासदार असल्याने ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याशिवाय ठाकरे गटासमोर काँग्रेसने शरणागती पत्करली असल्याची भावना मिलिंद देवरा समर्थकांमध्ये असल्यानं त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचं बोललं जात आहे.

11 वाजता सिद्धीविनायकाचं सपत्नीक दर्शन घेऊन मिलींद देवरा आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करतील. मिलिंद देवरा आणि गांधी घराण्याचे जवळचे संबंध आहेत. मिलिंद देवरा यांचे वडील मुंबई दक्षिण मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. त्यामुळे 55 वर्ष काँग्रेससोबत असलेलं देवरा कुटुंब आता पक्षातून बाहेर पडलं आहे.

यापूर्वी शनिवारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडण्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची बातमी खोटी असल्याचे म्हटले होते. नुकतीच काँग्रेस कार्यकारिणी जाहीर झाली तेव्हा मल्लिकार्जुन खरगे यांनी मिलिंद देवरा यांच्याकडे संयुक्त कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती, मात्र त्यानंतर अवघ्या 20 दिवसांनी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.