मुंबईतून राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार, संजय दिना पाटील यांचे नाव निश्चित

0
295

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मिळणाऱ्या एकमेव लोकसभा मतदारसंघावरही आता शिवसेनेने दावा केला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. समोपचाराने ही जागा आम्ही मागून घेऊ आणि माजी खासदार संजय दिना पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येईल, अशी घोषणा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली.

लोकसभा निवडणुकीची ठाकरे गटाकडून मुंबईत जोरदार तयारी करण्यात येत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेळावे आणि सभा घेण्यात येत आहे. भांडूप येथे रविवारी सायंकाळी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातील कोकणवासीयांचा मेळावा पार पडला. त्या वेळी राऊत यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघाबाबत भाष्य केले.
महाविकास आघाडीत अजून लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपाचा फार्म्युला ठरलेला नाही. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना नेते उद्धव ठाकरे गटाकडे असावा, असा आमचा आग्रह आहे. या मतदारसंघाचे माजी खासदार संजय दिना पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

वास्तविक, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत मुंबईमध्ये ईशान्य मुंबई हा एकमेव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला सोडण्यात आलेला आहे. या मतदारसंघातून संजय दिना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर २००९, २०१४ आणि २०१९ अशा तीन निवडणुका लढवल्या आहेत. त्यात २००९ मधील निवडणुकीत संजय दिना पाटील यांनी विजय मिळविला आहे, त्यामुळे मुंबईत ईशान्य मुंबई हा एकमेव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबरोबर आता शिवसेनाही आली आहे. या तीन पक्षांनी एकत्र येत २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले होते. आगामी लोकसभा निवडणूक एकत्रित लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात तीनही पक्षानी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे. शिवसेनेने मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे, त्यातून मेळावे आणि सभा घेण्यात येत आहेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने ईशान्य मुंबईवर दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुंबईतील एकमेव मतदारसंघही सोडला तर त्याचा परिणाम पक्ष, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यावर होतो. ईशान्य मुंबई शिवसेनेला सोडला तर मुंबईतील इतर कोणता मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येतो, हे पहावे लागेल.