मुंढवा जमीन प्रकऱणातील शीतल तेजवानी नवऱ्यासह विदेशात पसार

0
9

दि.०८(पीसीबी) – कोरेगाव पार्क येथील तब्बल 40 एकर भूखंड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील हे दोघे भागीदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही जमीन व्यवहार “अमेडिया कंपनी” मार्फत करण्यात आली असून, या कंपनीत पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे प्रमुख भागीदार आहेत. या व्यवहारात गंभीर गैरव्यवहार आणि शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी सहजिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, तसेच सह-दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आता पुण्यातील मुंढवा व बोपोडी येथील जमीन घोटाळ्यांची “मास्टरमाईंड” शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शीतल तेजवानीविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, तिचा मोबाईल फोन बंद आहे. तसेच ती तिच्या राहत्या पत्त्यावर आढळून आलेली नाही. ती नवऱ्यासह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. बावधन पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे, जेणेकरून तिचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का? हे याबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे शीतल तेजवानी ही कुख्यात गुंड निलेश घायवळसारखीच फरार झाली का? असा प्रश्न या निमित्त उपस्थित केला जात आहे.

कोण आहे शीतल तेजवानी?, वादग्रस्त इतिहास काय?
1.शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे पती-पत्नी आहेत.
2. सागर सुर्यवंशीने शितल तेजवानीसह कुटुंबियांच्या नावे घेतली 10 कर्जे
3. 41 कोटी रुपयांची 10 कर्जे घेताना सागर-शितलने सादर केली बनावट कागदपत्रे
4. सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शाखांतून उचलले कर्ज
5. ज्या कारणांसाठी कर्जे घेतली तिथे ती न वापरता दुसऱ्याच व्यवसायात वापरली
6. 2019 ला सहकार सह आयुक्त राजेश जाधवरांच्या ऑडिटमध्ये शितल-सागरचा घोटाळा उघड
7. सागर सुर्यवंशीने आणि शीतल तेजवानीने घेतलेली कर्जे मुद्दाम फेडली नाही
8. 31 मार्च 2021 पर्यंत कर्जांची रक्कम 60 कोटीच्या घरात
9. जानेवारी 2023 मध्ये ईडीकडून सागर सूर्यवंशीच्या घर आणि कार्यालयावर छापा
10. सागर सूर्यवंशीच्या 45 कोटींच्या मालमत्ता जप्त, मे 2023 मध्ये स्पेशल कोर्टात खटला
11. सागर सुर्यवंशीला ऑक्टोबर 2021मध्ये आधी सीआयडीने आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक
12. जामिनावर बाहेर येताच सागर सूर्यवंशीला जून 2023मध्ये ईडीकडून अटक

1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असं अंबादास दानवे म्हणाले. यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.