सातारा पोलिसांच्या दहशतीचा बळी ठरलेल्या तुषार खरात यांचा घणाघात
मुंबई, दि. २९ – देवेंद्रभाऊ, सातारा पोलीस आणि जयकुमार गोरे यांनी माझ्यावर केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सुद्धा डॉ. संपदा मुंडे यांचा आदर्श घेवून आत्महत्या करू का ? असा सवाल पत्रकार तुषार खरात यांनी केला आहे. खरात यांनी त्यांच्या ब्लॉकवर दिलेले पत्र जसे आहे तसेच देत आहोत.
भस्मासुरांनी पोलिसांना हाताशी धरून जर तुमच्यावर अन्याय केला, अन् त्या अन्यायाला वाचा फोडायची असेल तर आत्महत्या किंवा हत्या हाच एकमेव पर्याय राहिलेला दिसतोय. त्यामुळेच डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करून आपल्या अन्यायाला वाचा फोडली. माझ्यावर सुद्धा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सातारा पोलिसांनी चार खोटे गुन्हे दाखल करून पोलीस कोठडीत मारहाण केली, प्रचंड छळले. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच जयकुमार गोरे यांनी माण – खटाव तालुक्यात माजवलेली दहशत जगासमोर आणण्यासाठी मी सुद्धा आत्महत्या करू का ? असा सवाल वरिष्ठ पत्रकार तुषार खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
संपदा मुंडे, संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी, महादेव मुंडे, वैष्णवी हगवणे या निरपराध लोकांचे गेल्या काही दिवसांत बळी गेले. हे सगळे बळी सत्तेतील पुढारी व पोलीस यांच्यामुळे गेलेले आहेत. ते सर्वजण स्वर्गवाशी झाल्यानंतरच पोलीस व संबंधित पुढारी यांच्या अत्याचाराची दखल घेतली गेली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जर अन्यायाला वाचा फोडायची असेल तर कुणाचा तरी बळी गेला पाहीजे, हे देवेंद्र फडणवीस सरकारचे धोरण आहे असे दिसतेय. त्यामुळे जयकुमार गोरे व पोलिसांनी माझ्यावर जो अत्याचार केलेला आहे, त्याला वाचा फोडायाची असेल तर आता माझ्यासमोरही आत्महत्या हाच एकमेव रास्त व प्रभावी पर्याय दिसत आहे. त्यामुळे आता या पर्यायावर मी गांर्भिर्याने विचार करीत आहे, असे तुषार खरात यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तुषार खरात यांनी अधिकृतपणे प्रसिद्धीपत्रक जारी केले असून त्यात जयकुमार गोरे व पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला आहे. तुषार खरात असे म्हणतात की, जयकुमार गोरे आणि पोलिसांनी माझ्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांबद्दल वडूज व सातारा येथील सत्र न्यायालयांनी गंभीर निरीक्षणे नोंदविली आहेत. जयकुमार गोरे व पोलिसांवर न्यायालयांनी ताशेरे ओढलेले आहेत. ‘पोलिसांनी डोक्याचा वापर केलेला नाही’ असा शेरा न्यायालयाने मारलेला आहे. जयकुमार गोरे यांची सेटलमेंट म्हणून संभावना न्यायालयाने केलेली आहे. एट्रॉसिटी, खंडणी व विनयभंग असे अत्यंत् खोटारडे व तसूभरही तथ्य नसलेले चार गुन्हे जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी दाखल केले आहेत. यात तथ्य दिसत नसल्याचे न्यायालयांनी नमूद करतानाच पोलीस व जयकुमार गोरे यांच्यावर प्रचंड ताशेरे ओढलेले आहेत.
वडूज पोलीस कोठडीत असताना पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी मारहाण केली होती. स्वतः घनश्याम सोनावणे यांनी मला खाली बसवून माझ्या दोन्ही मांड्यावर बुट घातलेले पाय ठेवून उभे राहिले होते. कांबळे नावाचे पोलीस अधिकारी गुडघ्यावर बसले होते. शिरकुळे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने पायाच्या तळव्यावर पट्ट्याने प्रचंड मारहाण केली. वेदनेमुळे पाय सोडवून घेतल्यानंतर घनश्याम सोनावणे यांनी पाठीमागून माझ्या पाठीत त्यांचे स्वतःचे गुडघे रूतवले होते. त्यानंतर हात पुढे करायला लावून हातावर पट्ट्याने मारहाण केली होती. याबाबत मी दुसऱ्या दिवशी न्यायालयासमोर लेखी तक्रार केली. त्यावर न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायालयाने सातारा जिल्हा रूग्णालयाला लेखी आदेश देवून आरोग्य तपासणी करण्यास सांगितले. परंतु तिथे पोलिसांनी डॉक्टरांवर दबाव टाकून खोटा रिपोर्ट तयार करायला लावला. खरेतर माझ्या हाताची बोटे सुजलेली होती. पायाचे तळवे ठणकत होते. पण पोलिसांची जिल्हा रूग्णालयासोबत मिलीभगत असल्यामुळे खाकी वर्दीतील गुंड घनश्याम सोनावणे व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीच्या खुणा अहवालात येणार नाहीत, याची काळजी पोलिसांनी घेतली.
दहिवडी पोलीस ठाण्याच्या कोठडीत असताना सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे याने मला खोटा जबाब देण्यासाठी धमकी दिली. प्रभाकर देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर व इतर अनेक लोकांनी खोटी नावे घ्या, नाहीतर तुमच्यावर आणखी चार – पाच खोटे गुन्हे दाखल केले जातील, आणि तुमच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून फलटणच्या दिगंबर आगवणे यांना जसे जेलमध्ये सडवले आहे, तशा पद्धतीने सडवू अशी धमकी दिली. अक्षय सोनावणे याने दिलेल्या या धमकीचा सगळा तपशिल आपण न्यायालयासमोर सांगितला. एवढेच नव्हे तर, न्यायालयाकडे लेखी तक्रार सुद्धा केली होती. पोलीस न्यायालयाचे आदेश सुद्धा धाब्यावर बसवतात, अशी खंत तुषार खरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
जयकुमार गोरे यांनी आपला कार्यकर्ता शेखर पाटोळे याला पुढे घालून माझ्यावर खोटी एट्रॉसिटी दाखल केली होती. तुषार खरात यांनी शेखर पाटोळे याला मारहाण केली व त्याचा जातीवाचक उल्लेख केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वास्तवात, मी शेखर पाटोळे याला आयुष्यात कधीही पाहिलेले नाही. असे असताना अत्यंत खोटारडा FIR दाखल करण्यात आला. या खोट्या गुन्ह्यामध्ये फलटणचे सध्या वादात सापडलेले पोलीस उपअधिक्षक राहूल धस हे तपास अधिकारी होते. खरेतर वडूज पोलीस ठाणे राहूल धस यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही. परंतु ते भाजप नेत्यांचे घरगडी असल्याप्रमाणे भाजप नेत्यांना हवा तसा तपास करतात. त्यामुळेच त्यांच्याकडे या खोट्या घटनेचा तपास करण्याची जबाबदारी दिल्याचे तुषार खरात यांनी म्हटले आहे.
या राहूल धस यांनी तपासाच्या नावाखाली माझ्या मुंबईतील कार्यालयात व घरात धाड टाकली. कार्यालयातील सगळे संगणक, लॅपटॉप, मेमरी कार्ड असे २५ प्रकारचे इलेक्टॉनिक्स साहित्य व इतर बरेच साहित्य ताब्यात घेवून गेले. माझ्या मुलीची दहावीची परीक्षा सुरू असताना घरात धाड टाकून मुलीच्या अभ्यासाचा लॅपटॉप पोलिसांनी नेला. वास्तवात तक्रारच खोटी असल्यामुळे हे साहित्य नेण्याचे काहीही कारण नव्हते. परंतु जयकुमार गोरे यांच्या विरोधातील पुरावे तपासून ते नष्ट करण्यासाठी पोलिसांनी हे साहित्य बेकायदेशीरणे दरोडेखोरासारखे नेल्याचा संतप्त आरोप तुषार खरात यांनी केला आहे.
राहूल धस यांच्या या कृतीमुळे मी रिझर्व्ह बँक परिसरात स्वकष्टाने उभारलेले लय भारीचे कार्यालय बंद पडले. लय भारी ही महाराष्ट्रातील एकमेव डिजिटल न्यूज मीडिया कंपनी आहे की, ज्या कंपनीला गुगलने १६.६५ लाख रूपयांचे अनुदान दिले होते. हे अनुदान व आयुष्यभराची कमाई खर्च करून मी हे कार्यालय उभे केले होते. पण पोलिसांनी ते बंद पाडले. पोलिसांनी हे साहित्य नेण्याची काहीही गरज नव्हती. पोलिसांनी मुंबईला जायचीच गरज नव्हती, असे न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढलेले आहेत. या एट्रॉसिटीच्या गुन्ह्यात काहीही तथ्य आढळत नाही, असे न्यायालयाने जामीन देताना म्हटले आहे.
दुसरा गुन्हा स्वतः जयकुमार गोरे यांनी दाखल केलेला आहे. बळवंत पाटील नावाच्या माझ्या कार्यकर्त्याला तुषार खरात यांनी मुंबईत बोलाविले व त्यांच्याकडे पाच कोटीची खंडणी मागितली असा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. वास्तवात, बळवंत पाटील नावाच्या व्यक्तीला गेल्या १० – १२ वर्षांत आपण कधीही भेटलो नाही. त्यांच्याशी फोनवर सुद्धा कधीही बोलणे झालेले नाही. बळवंत पाटील यांचे थोबाड सुद्धा मला आठवत नाही. असे असताना जयकुमार गोरे यांनी आपल्या मंत्रीपदाचा दुरूपयोग करून खोटारडा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात न्यायालयाने सुद्धा पोलीस व गोरे यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. तुषार खरात यांनी कधी फोन केला, खंडणीसाठी कुठे भेट झाली याचा कोणताही पुरावा पोलीस अधिकाऱ्यांना समोर आणता आलेला नाही. एवढेच नव्हे तर Whats App संवादाच्या अनुषंगानेही काहीच पुरावा समोर आलेला नाही. केवळ ऐकीव माहितीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे न्यायालयाने जामीन देताना नमूद केले आहे.
तिसरा खोटा गुन्हा संबंधित महिलेने १ कोटी रूपये खंडणी स्विकारल्याचा नोंद केला होता. त्यात मलाही आरोपी केले होते. वास्तवात या गुन्ह्यामध्ये न्यायालयाने जयकुमार गोरे, पोलीस, तक्रारदार यांच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. जयकुमार गोरे यांचा बुरखा न्यायालयाने टराटरा फाडला आहे. न्यायालयाने जयकुमार गोरे यांच्याविषयी काय म्हटले आहे, याचे जाहीर वाचन देवेंद्र फडणवीस यांनी हिंमत असेल तर विधानसभेच्या सभागृहात करावे, असे आव्हान तुषार खरात यांनी दिले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, संबंधित महिला जयकुमार गोरे यांच्या विरोधात उपोषणाला बसणार होती. तिला यापासून परावृत्त करण्यासाठी जयकुमार गोरे यांनीच तक्रारदार विराज शिंदे, वकील शाहीद इनामदार व साक्षीदारांना पुढे घालून सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलिसांनी संबंधित महिलेविषयी काही रेकॉर्डिंग न्यायालयात सादर केले आहे. या रेकॉर्रिंडमध्ये कुठेही ती महिला पैसे मागताना दिसत नाही. एवढेच नव्हे तर तक्रारदार विराज शिंदे हाच स्वत:हून त्या महिलेला पैसे घ्या, फ्लॅट मागा असे म्हणत आहे. परंतु ती महिला कुठेही पैसे मागताना दिसत नाही. या कटातील मुख्य सूत्रदार वकील शाहीद इनामदार आहे. त्याला आरोपी बनवायला हवे. परंतु पोलिसांनी त्याला आरोपी बनविले नसल्याबद्दल न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. एवढेच नव्हे तर वकील असलेल्या शाहीद इनामदार याने अशा प्रकरणामध्ये सामील व्हावे हे वकिलीच्या व्यावसायाला शोभणारे नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
पोलिसांनी संबंधित महिला, मी व इतर काहीजणांवर संघटीत गुन्हेगारीचे कलम १११ लावण्यात होते. त्यावर पोलिसांनी डोक्याचा वापर केलेला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. याच कलमाचा आधार घेवून पोलीस व जयकुमार गोरे हे तुषार खरात, संबंधित महिला, अनिल सुभेदार, रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे व इतर १९ जणांच्या मागे हात धुवून लागले होते. परंतु न्यायालयाने गोरे व पोलीस यांची अब्रु वेशीवर टांगल्यामुळे हे कलम हटविण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवली आहे.
तुषार खरात हे पत्रकार आहेत. ते कोणालाही फोन करू शकतात. राजकीय क्षेत्रातील लोकं एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात. त्यामुळे त्यांनी एकमेकांना फोन केले म्हणून त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारीची कारवाई होवू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
चौथा खोटा गुन्हा एका महिलेचा विनयभंग केल्याबाबत दाखल केला होता. ही महिला (व इतर वरील सगळे तक्रारदार व साक्षीदार) जयकुमार गोरे यांची कार्यकर्ता आहे. या महिलेला मी आयुष्यात कधीही पाहिलेले नाही. तिचे नावही ऐकलेले नाही. असे असताना या महिलेला पुढे घालून जयकुमार गोरे व पोलीस यांनी खोटा गुन्हा दाखल केला होता. मी बाजारातून घऱी जात असताना तुषार खरात यांनी मला थांबविले व तुम्ही जयकुमार गोरे यांचे काम करू नका असे म्हणाले. त्यांनी माझा हात पकडला. मला जातीयवाचक बोलले, अशी अत्यंत खोटारडी तक्रार संबंधित महिलेने केली. या तक्रारीत कहीही तथ्य दिसत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
या चार गुन्ह्यांत काहीही तथ्य नसताना जयकुमार गोरे यांनी पोलिसांना हाताशी धरून मला १०२ दिवस कारागृहात डांबले, कारागृहातही मला प्रचंड त्रास दिला. माझे कार्यालय बंद पाडले, माझी पत्रकारिता उद्ध्वस्त केली, माझ्या कुटुंबाला त्रास दिला. जयकुमार गोरे व पोलिसांनी दडपशाही केली याबाबत मी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांना भेटून त्यांच्याकडे २२ पानांची लेखी तक्रार दाखल केलेली आहे. परंतु तुषार दोशी यांनी पोलिसांची पाठराखण केली. ते उघडपणे पोलिसांना पाठीशी घालत आहेत.
खरेतर, जयकुमार गोरे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर २४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. फलटणपेक्षाही भयानक दहशत जयकुमार गोरे यांनी माण – खटावमध्ये माजवलेली आहे. मायणी महाविद्यालय, सिद्धनाथ पतसंस्था त्यांनी हडपली आहे. त्यांच्या वाहनाने दोघांचा बळी घेतलेला आहे. त्यांच्या कार्यर्त्यांनी एका नागरीकाला लोखंडी रॉडने पाय मोडेपर्यंत मारहाण केलेली आहे. जयकुमार गोरे यांनी टेंडर माफिया, वाळू माफिया मोठ्या संख्येने निर्माण केले आहेत. गोरे, माफिया व पोलीस यांची अभद्र युती झालेली आहे. अक्षय सोनावणे हा पोलीस अधिकारी १० वर्षांपासून माण व फलटण या दोन तालुक्यांतील पोलीस ठाण्यात आहे. जयकुमार गोरे यांचा हस्तक म्हणून हा अक्षय सोनावणे निरपराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करीत असतो. तो सध्या म्हसवड पोलीस ठाण्यात कार्यरत असला तरी माण – खटावमधील सगळ्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना धाकात ठेवून तिथे जयकुमार गोरे यांना हवे तसे सामान्य लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम करीत असतो. जयकुमार गोरे मंत्री झाल्यानंतर तर निरपराध लोकांना खोटे गुन्हे दाखल करणे, गोरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांना दमदाटी करणे असे प्रकार मोठ्या संख्येने सुरू झाले आहेत, याकडे तुषार खरात यांनी लक्ष वेधले आहे.
माझ्यावर झालेल्या या अन्यायाची पोलीस व सरकार दखल घेत नाही. दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे, पोलीस व माफिया यांनी माण – खटावमध्ये तालिबानी राज्य सुरू केले आहे. हे सगळे भयानक प्रकार जनतेसमोर येणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस यांचेच गोरे, पोलीस व माफिया यांना प्रोत्साहन आहे. त्यामुळे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सुद्धा डॉ. संपदा मुंडे यांच्या प्रमाणे आत्महत्या करू का ? असा सवाल तुषार खरात यांनी केला आहे. डॉ. संपदा मुंडे यांनी पोलिसांकडे तक्रारी करूनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. मी तर पत्रकार आहे. जयकुमार गोरे व पोलिसांचे अत्याचार मी माझ्या यू ट्यूब चॅनेलवरून घसा फोडून सांगतोय. पोलिसांकडे लेखी तक्रारी करतोय, तरीही गेंड्याच्या कातडीचे फडणवीस सरकार दखल घेत नाही. त्यामुळे माझ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आत्महत्या करणे हाच पर्याय योग्य आहे का ? असा सवाल तुषार खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
जयकुमार गोरे यांच्या विरोधात केलेल्या पत्रकारितेचा मला अभिमान –
मी जयकुमार गोरे यांच्या विरोधात बातम्या केल्या म्हणून जयकुमार गोरे यांनी माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. जयकुमार गोरे यांनी कोरोनातील मृत रूग्णांच्या नावावर अनुदान हडपले, त्यांनी मायणी कॉलेज हडपले, मायणी कॉलेजच्या संस्थापकांना ईडीच्या तुरूंगात डांबले. मृत दलित व्यक्तीच्या खोट्या सह्या करून त्याची जमीन हडपली. गोरे यांच्यावर सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, धर्मादाय आयुक्त यांनी वारंवार ताशेरे ओढलेले आहे. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. ते घोटाळेबाज आहेत. त्यामुळे त्यांचे घोटाळे मी चव्हाट्यावर आणून पत्रकारितेचा धर्म बजावला आहे. त्याचा मला अभिमान आहे. जयकुमार गोरे यांचे घोटाळे भविष्यातही चव्हाट्यावर आणण्यासाठी मी माझ्या पत्रकारितेचा धर्म बजावत राहीन, असेही तुषार खरात यांनी ठणकावले आहे.
पत्रकारितेतील सर्व बांधवांना माझी विनंती आहे की, माझी सत्य बाजू पुराव्यासहीत आपणाकडे देत आहे. मी कारागृहात असताना जयकुमार गोरे व पोलिसांनी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून माझी बदनामी केली होती. परंतु जयकुमार गोरे हे किती खोटारडे आहेत हे न्यायालयांनी माझ्या प्रकरणात समोर आणलेले आहे. परंतु ज्या प्रसारमाध्यमांनी माझी बदनामी केली, त्या प्रसारमाध्यांनी माझ्याविषयी व गोरे यांच्याविषयी काय म्हटले आहे ही सत्य माहिती प्रसारित करण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. पत्रकारितेविषयी निष्ठा असलेल्या पत्रकारांना माझी विनंती आहे की, माझी ही खरी बाजू आपण प्रसिद्धी करावी ही विनंती.
संपर्क – तुषार खरात ९८२१२८८६२२














































