मी तुमच्यात किती दिवस राहील, माहीत नाही – मनोज जरांगे पाटील

0
47

जालना, दि. १७ (पीसीबी) – राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सध्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अनेक राजकीय सभा पार पडत आहेत. त्यातच आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक भावनिक आवाहन केलं आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. मी कधी जाईल माहित नाही, मी तुमच्यात किती दिवस राहील, माहीत नाही, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. सध्या त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी लासलगावमधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही. मी कधी जाईल माहित नाही, मी तुमच्यात किती दिवस राहील, माहीत नाही”, असे विधान केले.

मनोज जरांगे काय म्हणाले?
“मला दर ८-१५ दिवसाला सलाईन लावली जात आहे. मला खूप वेदना होत आहेत. माझ्या शरीराची नुसती आग होत आहे. माझ्या शरीरातील हाडंही आता दुखायला लागली आहे. उपोषणामुळे माझे शरीर मला आता थोडीही साथ देत नाही. मी फक्त माझ्या माय-बाप समाजाची ताकद वाढावी, मराठ्यांची उंची वाढावी, त्यांची शान वाढवी, त्यांचे शक्ती आणि बळ वाढले पाहिजे, यासाठी धीर धरुन सर्व काही सुरु आहे. माझी तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही. माझी सर्वात मोठी संपत्ती तुम्ही आहात. माझा देव तुम्ही माझा बाप तुम्ही आहात”, असे मनोज जरांगे म्हणाले.

“ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा असं आवाहन मी लोकसभेला केलं होतं. आता विधानसभेलाही मी तेच तुम्हाला सांगितलं. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, मी तुम्हाला बंधनमुक्त केलंय. मतदान तुमचं आहे, मालक पण तुम्हीच आहात. मी तुमचा मालक नाही. मी फक्त तुमचा मुलगा म्हणून इमानदारीने काम करत आहे”, असे जरांगे पाटील म्हणाले.

“सर्वांनी सामूहिक आंदोलन करायचं”
“आता गावागावत उपोषण करायचं नाही. आता सर्वांनी एकत्र येऊन एका ठिकाणी उपोषण करायचे. मराठा एकदम विचित्र आहे, शांत आहेत तोपर्यंत शांत आहे, सरकार कोणाचंही येऊ द्या, त्यांचं डोकं बंद पडलं पाहिजे. आपण सर्वांनी सामूहिक आंदोलन करायचं”, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

“मला प्रचंड वेदना होतात. मला सलाईन लावावी लागते. मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी वाटते. आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही. मी कधी जाईल माहित नाही, मी तुमच्यात किती दिवस राहील..माहीत नाही”, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.