मी ढापलेली निशाणी नाही, मी कमवलेली निशाणी आहे; राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

0
2

मुंबई, दि. 30 (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड आणि शिवसेना पक्षावर केलेल्या दाव्यावर टीका केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी देण्यात आल्यानंतर मनसेकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. “आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार न देणं हा माझा निर्णय होता. आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मला तसं वाटलं की इथे उमेदवार टाकू नये. मी त्याप्रमाणे ती गोष्ट केली. त्याची मला खंतही नाही. मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही”, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे दक्षिण मुंबईच्या जागेवर मनसेला निवडणूक लढवायची होती. पण शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला होता. याचबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. “हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग झाला. प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार वागत असतो. हा भाग स्वभावाचा असतो. भाजपला ही गोष्ट समजू शकते. पण सगळ्याच पक्षाला समजेल, असं नाहीय. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचं त्यांना ओरबाडू देत. आपण किती सांगायला जायचं आणि कुठे सांगायला जायजं, काय-काय सांगायला जायचं? याचा अनुभव तुम्हाला लोकसभेला आलाच असणार. गेल्या लोकसभेच्या वेळेला दक्षिण मध्य मुंबईत आपण सांगत असतो की, ही गोष्ट तुमच्या हातातली नाहीय. ही जागा तुम्हाला लागणार नाही. ही गोष्ट तुम्ही अशी करु नका. हे सांगून हट्टापाई पदरात जागा पाडायची असेल तर पाडून घ्या”, असं राज ठाकरे म्हणाले.

‘मी ढापलेली निशाणी नाही’

“दक्षिण मुंबईची जागा लढवली असती तर शंभर टक्के आम्ही जिंकलो असतो. पण त्यानंतर तुम्ही मला सांगत आहात की, आमच्या निशाणीवर निवडणूक लढवली पाहिजे. कसं आहे, मी कमवलेली निशाणी आहे, ढापलेली निशाणी नाही. इतक्या वर्षांच्या निवडणुकीच्या प्रवासात मला मिळालेली निशाणी आहे. लोकांच्या मतदानातून ती निशाणी मला मिळालेली आहे. कोर्टातून आलेली निशाणी नाही”, असा टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

‘पक्षाचं नाव घेणं, चिन्हं घेणं ही गोष्ट योग्य नाही’

“माझा कुणाचा पक्ष फुटण्याला आणि चिन्हाला विरोध नाहीय. मला या प्रोसेसला विरोध आहे. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही 40 आमदार घेऊन गेलात ना? हे फोडाफोडीचं राजकारण मी समजू शकतो. अगदी राष्ट्रवादीचे शरद पवार आपल्या महाराष्ट्रात आहेत की, ज्यांनी अगदी पुलोदपासून ही सर्व सुरुवात केली. फोडाफोडीचं राजकारण मी समजू शकतो. पक्षाचं नाव घेणं, चिन्हं घेणं ही गोष्ट योग्य नाही. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव घेणं, घड्याळ चिन्ह घेणं ही गोष्ट मला वाटतं योग्य नाही. शिवसेना आणि धनुष्यबाण ही उद्धव ठाकरेंची कमाई नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची कमाई आहे. त्यांचं अपत्य आहे. त्यांनी कमावलेली ती निशाणी आहे. अशाप्रकारचं राजकारण मला आवडत नाही. आता हे बोलणं काही पाप आहे का?”, असं राज ठाकरे यांनी सुनावलं.