…मी जर तोंड उघडले तर कित्येक लोकांना फिरता येणार नाही

0
161

बारामती, दि. १० (पीसीबी)- सध्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय यांच्यात लढत होत आहे. पवार कुटुंबातील अजित पवार आणि शरद पवार यांच्यात ही लढत होत आहे. या लढतीत अजित पवार यांच्या विरोधात संपूर्ण पवार कुटुंबीय उतरले आहे. अगदी शरद पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार अजित पवार यांच्या विरोधात उतरले आहेत. ते सुप्रिया सुळे यांचा जोरात प्रचार करत आहे. त्यावेळी अजित पवार यांच्यावर घणाघाती हल्ला ते करत आहेत. आता या सर्वांचा समाचार अजित पवार यांनी घेतला आहे. कोणाचे नाव न घेता कुटुंबातील लोकांना त्यांनी इशारा दिला आहे.

बारामतीमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्या निवडणुकीत कधी भावंडे फिरले नाहीत. पण आता गरागरा फिरत आहेत. पावसाळ्यात छत्री उगतात, तशी ही उगवली आहेत. मी फार तोलून मापून बोलतोय, एकदा मी जर तोंड उघडले तर कित्येक लोकांना फिरता येणार नाही. तोंड दाखवता येणार नाही. कुणी पाणी देणार नाही. मी गप्प बसलो म्हणजे फार वळवळ करता का? अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी इशारा दिला.

बारामती लोकसभा मतदार संघात शिवसेना नेते विजय शिवतारे उभे राहणार होते. त्यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांना माघार घेतला. विजय शिवतारे यांनी माघार घेतल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्यांना फोन केला. माघार घेऊ नका, असे स्पष्ट सांगितले.

तुम्हाला ते दाखवले तर कळेल कोणाचे नंबर आहेत. ते नंबर पाहून मला वाईट वाटले. हे नंबर विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दाखवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दाखवले. सध्या कुठल्या पातळीचे राजकारण चालले आहे, हे दिसत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.