मी गुजराती असल्याचा मला अभिमान म्हणनाऱ्या अंबानींना मनसेचा सल्ला… बोऱ्या बिस्तरा गुंडाळा

0
147

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – मी गुजराती असल्याचा मला अभिमान आहे. ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील, असे रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये म्हणाल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुकेश अंबानींना खडे बोल सुनावले आहेत. ”रिलायन्स गुजराती कंपनी आहे. ते माझी कर्मभूमी गुजरात असल्याचंही सांगतात. मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला?, असा सवालही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.

आम्हाला रिलायन्स कंपनी भारतीय वाटली होती. पण त्यांनी काल स्पष्ट केलं की, रिलायन्स गुजराती कंपनी आहे. इथे तुमची कंपनी उभारण्यासाठी मराठी माणसाने जमिनी दिलेल्या आहेत. जर तुम्हाला ही कंपनी गुजरातची वाटत असेल तर सगळा बोऱ्याबिस्तारा गुंडाळा,अँटेलियालाही गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा, महाराष्ट्रात तुमचं काय काम आहे? मराठी माणसाने यापुढे विचार केला पाहिजे. मराठी लोकांनी रिलायन्सचं प्रोडक्ट घेताना विचार केला पाहिजे की, आपण हे भारतीय कंपनीकडून नाही घेत आहोत, आपण गुजराती कंपनीकडून घेत आहोत. ह्यांचा उद्देश फक्त गुजरातचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्रात तुम्ही काय करताय हा आमचा प्रश्न आहे, असंही संदीप देशपांडे म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा त्यांच्या बाजूला उपस्थित होते. त्यावेळी निदान मोदींनी तरी त्यांना सांगायला हवं होतं, तुझी कंपनी भारतीय आहे, गुजराती नाही. आता पंतप्रधानही गुजरातचे आहेत की देशाचे हासुद्धा विचार करण्याचा विषय आहे. जेव्हा राज ठाकरे आणि आम्ही मराठी भाषेबद्दल बोलतो तेव्हा अख्खा देश आम्हाला संकुचित ठरवतो. हे महाराष्ट्राबद्दल विचार करतात हे संकुचित आहेत, हे फक्त मराठी माणसाबद्दल विचार करतात. मग मुकेश अंबानी संकुचित नाही का? मोदी फक्त गुजरातबद्दल विचार करत असतील तर ते संकुचित नाहीत का? हा प्रश्न आहे. यात मराठी माणसाने जागरूक होण्याची गरज आहे. मराठी माणसाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय, याबद्दल मराठी माणसानं जागरूक राहिलं पाहिजे. मराठ्यांच्या जमिनी जातायत आणि तिथे गुजरात्यांचे उद्योग होतायत, मराठी माणसाला रोजगारही मिळत नसल्याचंही संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.