मी आप पक्षाची मुख्यमंत्रीपदाची उमेदवार असल्याचा निव्वळ अपप्रचार

0
202

शहादा (धुळे), दि. १५ (पीसीबी) : नर्मदा खोरे विस्थापितांच्या नवनिर्माण न्यास संस्थेबाबत खोटे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. त्या म्हणाल्या, मी आप पक्षाची मुख्यमंत्रीपदाची उमेदवार असल्याचा अपप्रचार केला जात आहे.

त्या म्हणाल्या, ‘हेराफेरीचाही आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणा ‘ईडी’मार्फत चौकशी केली. खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. नर्मदा आंदोलनाबाबत निराधार प्रश्न उपस्थित केले जात असून, गुजरातच्या निवडणुकीत मुद्दा बनविण्याच्या खटाटोप असल्याचेही श्रीमती पाटकर यांनी सांगितले.

केंद्रामार्फत लावण्यात येत असलेल्या आरोपासंदर्भात पाटकर यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते कांती पावरा, निमा पटले, पुण्या वसावे, अनिल कुवर, ओरसिंग पटले आदी उपस्थित होते. नर्मदा खोऱ्यातील विस्थापितांना न्याय देण्यासाठी २००४ मध्ये विश्वस्त संस्था नवनिर्माण न्यास संस्थेची स्थापना केली, ज्यात शेतकरी, नर्मदा खोऱ्यातील आदिवासी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट कलावंत यांचा समावेश केलेला आहे. अत्यंत पारदर्शक व्यवहार असलेल्या संस्थेवर खोटे आरोप लावून बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे, असा आरोप करीत श्रीमती पाटकर म्हणाल्या, ‘‘आम्ही हेराफेरी करणारे आहोत, असा आरोप लावून आमचे आंदोलन थांबणार नाही, ते सुरूच राहील. आम्ही उलट तपास यंत्रणांना सहकार्य करीत असतो. पाच हजारांपेक्षा जास्त कागदपत्रे दिली आहेत. आंदोलनाबाबत आमचा मुद्दा खरा आहे. त्याला शासकीय तपास यंत्रणाचा उपयोग करून दाबण्याच्या प्रयत्न केला जात आहे.’’