‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की’.. मिटकरींच्या ट्विटने खळबळ!

0
371

मुंबई, दि. २२ जुलै (पीसीबी) – मागील एक वर्षापासून राज्याच्या राजकारणात अविश्वसनीय वाटणाऱ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणले. सरकारमध्ये एन्ट्री घेत उपमु्ख्यमंत्रीही बनले. आता तर त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले होते. आज अजित पवार यांचा वाढदिवस आहे. कार्यकर्त्यांनी अजितदादांचे भावी मु्ख्यमंत्री म्हणून फलक लावले आहेत. त्यानंतर आता अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनीही असेच एक ट्विट केले आहे.

मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…! लवकरच #अजितपर्व’ असे कॅप्शन दिले आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर शपथ घेतलेल्या आमदारांनाही मंत्रीपदे मिळाली. मात्र, अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सातत्याने सुरू आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यात तथ्य आहे की नाही हे आगामी काळात समजेलच. मात्र या चर्चांनी राज्याचे राजकारण एक वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवले आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्याच्या परिसरातही अजित पवार यांचे मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागले आहेत. त्यामुळेही वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर शिंदे गटातील नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अजितदादा लवकरच मुख्यमंत्री – राऊत
अजित पवार भावी आहेत पण ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. काय घडामोडी घडत आहेत ते मलाही माहिती आहे. मग त्या घडामोडी कायदेशीर असतील, घटनात्मक असतील किंवा राजकीय असतील. मात्र, अजित पवार भविष्यातील मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे भविष्य लवकर जवळही येत आहे. ते मुख्यमंत्री होतील यात काही शंका नाही. मी यआधीही अजित पवार मुख्यमंत्री होतील असे म्हटले होते. आता शिंदे गटानेही हे सत्य स्वीकारले पाहिजे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत केले होते.