मुंबई दि. ११ (पीसीबी) -: एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली होती. अडीच महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांना थोपवण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही पक्ष मजबूतीकरणावर भर दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने भाजपाने तयारी सुरु केली असली तरी शिवसेनाही मागे राहिलेली नाही. उत्तर प्रदेशात संघटना मजबूत करण्यासाठी 30 जिल्ह्यांमध्ये जिल्हाप्रमुखांची नव्याने घोषणा करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशामध्ये भाजपाचे वर्चस्व आहे. असे असताना ज्या पद्धतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत येऊन पक्ष संघटनेवर भर देण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने आता शिवसेना देखील पावले उचलत आहे. आता तडजोडीचे राजकारण नाही असे म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने 30 जिल्ह्यांमध्ये जिल्हाप्रमुखांची निवड केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुखांनी आता पक्ष संघटनेवर भर दिला आहे. महाराष्ट्रात हे काम तर सुरु आहेच, पण आता उत्तर प्रदेशातही त्यांनी या कामाला सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. तर आगामी काळात पक्ष प्रमुख तसेच शिवसेनेतील बडे नेते उत्तरप्रदेशात असणार आहेत. केवळ लोकसभा निवडणूकच नव्हे तर महापालिका निवडणूकांमध्येही शिवसेनेचा उमेदवार राहणार असल्याचे अनिस सिंह यांनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेशातील 30 जिल्ह्यांमध्ये अनिल सिंह यांनी जिल्हाप्रमुखांची घोषणा केली आहे. त्यामध्ये मुझफ्फरनगर, फरुखाबाद, नोएडा, बुलंदशहर, कासगंज, फिरोजाबाद, अमरोहा, बरेली, पिलीभीत, मिर्झापूर, आंबेडकर नगर, लखीमपूर खेरी, मुरादाबाद, मेरठ, गाझियाबाद, सीतापूर, गोंडा, कन्नौज, बहराईच, बस्ती, चंदौली, प्रतापगढ, बाराबंकी, फतेहपूर, कौशांबी, बांदा, चित्रकूट, सोनभद्र, प्रयागराज आणि आग्रा यांचा समावेश आहे.