पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – शहरातील थकीत मालमत्ता धारकांचे नळजोड तोडण्याची कायद्यात तुरतूद आहे. त्यामुळे जे मालमत्ताधारक कर भरणार नाहीत, त्यांचे नळजोड तोडण्यात येत आहे. मात्र, एखाद्या सोसायटीतील काही लोकांनी कर भरला असेल तर संपूर्ण सोसायटीचे नळजोड न तोडता फक्त कर न भरणाऱ्यांचे पाणी कसे तोडता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
शहरात 5 लाख 90 हजार निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहे. आतापर्यंत 565 कोटी रुपये मिळकतकराचा भरणा झाला आहे. 1 लाख 62 हजार निवासी मिळकतधारकांकडून अनधिकृत बांधकाम शास्तीकर वगळून मूळ मिळकतकरांची 480 कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने जप्ती मोहीमेसह, नळजोड तोडण्याचीही कार्यवाही करण्यात येत आहे.
काही थकबाकीदारांसाठी संपूर्ण सोसायटीचे नळजोड तोडणे योग्य आहे का? याबाबत आयुक्त सिंह यांना विचारले असता ते म्हणाले, मालमत्ता कर न भरणाऱ्यांचे नळजोड तोडण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे पिंपरी पालिका वेगळे असे काही करत नाही. एखाद्या सोसायटीतील काही लोकांनी कर भरला असेल तर संपूर्ण सोसायटीचे नळजोड न तोडता फक्त कर न भरणाऱ्यांचे पाणी कसे तोडता येईल, यासाठी संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मात्र, वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे.
सद्यस्थितीत शहरात कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे. मात्र, सरकारच्या वतीने खबरदारी घेण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार कोरोना रूग्णांसाठी आकुर्डीतील नवीन रूग्णालयात बेड, आयसीयूची तयारी करण्यात आली आहे. गरज पडल्यास नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव रूग्णालयातही बेड उपलब्ध करण्यात येतील. तसेच आठ रूग्णालयात लसीकरणाची मोहीमही सुरू असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.