मिळकतकर न भरणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात दोन लाख मालमत्ता

0
164

१९ जुलै (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल दोन लाख नवीन आणि वाढीव बांधकामाची नोंद नसल्याचा महापालिकेचा अंदाज आहे. सर्वेक्षणात केलेल्या मालमत्तांची कर आकारणी करण्यात येणार आहे. याकरिता मालमत्ताधारकांना विशेष नोटीस देण्यात येत आहेत. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांची कर आकारणीवर हरकत, आक्षेप असतील, त्या नागरिकांनी सुनावणीसाठी सुविधा केंद्रावर जाऊन आक्षेप घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील नवीन, वाढीव अशा मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणात आढळलेल्या मालमत्ताधारकांना विशेष नोटीस देण्यात येत आहे. ज्या मालमत्ता धारकांचे कर आकारणीबाबत हरकत, आक्षेप असतील, अशा मालमत्ताधारकांच्या सुनावणीसाठी शहरातील विविध भागात सात ठिकाणी सर्व सुविधांयुक्त केंद्र निश्चित केले आहेत. त्या नागरिकांना ऑफलाईन, ऑनलाईनद्वारे आक्षेप घेता येणार आहे.

महापालिकेच्या कर संकलन कार्यालयात ६ लाख ३० हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. मात्र त्यानंतरही महापालिका हद्दीत नोंदणी नसलेल्या सुमारे दोन लाख नवीन आणि वाढीव बांधकाम असलेल्या मालमत्ता आढळण्याचा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळेच आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी नवीन, वाढीव अशा मालमत्तांचा ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मालमत्ता सर्वेक्षणासाठी महापालिकेने स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. कंपनीची नियुक्ती केली असून सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या नवीन मालमत्ताधारकांना कर आकारणीबाबत पहिली विशेष नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसबाबत मालमत्ताधारकांची काही हरकत, आक्षेप असल्यास संबंधित झोन कार्यालयात लेखी तक्रार दाखल करता येईल. यासाठी महापालिकेने सात ठिकाणी सुनावणी केंद्र निश्चित केले आहेत. सुनावणीसाठी आक्षेप असलेल्या आपल्या मिळकतीची सर्व कागदपत्रे मालमत्ता धारकांनी आणल्यानंतर तत्काळ सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात पहिल्या टप्प्यात २४ हजार नवीन आणि वाढीव मालमत्ता धारकांना प्रथम विशेष नोटीस बजावली आहे. या आठवड्यात ३० हजार आणि ३१ जुलैपर्यंत ७५ हजार जणांना प्रथम विशेष नोटीस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ही आहेत सुनावणीची सात ठिकाणे
 वाकड, थेरगाव, किवळे, कस्पटे वस्ती- वाकड विभागीय कार्यालय (नवीन कार्यालय इमारत), तेजस इंपेरीया, वाकड पोलीस चौकी शेजारी, भुजबळ चौक, वाकड.
 आकुर्डी, निगडी, चिंचवड- आकुर्डी विभागीय कार्यालय-पांडुरंग काळभोर सभागृह, पांढारकर नगर, आकुर्डीगाव‌.
 सांगवी, मनपा भवन, फुगेवाडी- दापोडी- फुगेवाडी-दापोडी विभागीय कार्यालय मनपा दवाखाना इमारत, पहिला मजला, रेल्वे गेट जवळ, कासारवाडी.
 तळवडे, चिखली- तळवडे विभागीय कार्यालय-श्री. स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन, सेक्टर नं. २१, शिवभूमी विद्यालयाजवळ, यमुनानगर, निगडी.
 मोशी, भोसरी-मोशी विभागीय कार्यालय (नवीन कार्यालय इमारत) सन हार्मोनी, तळमजला गाळा क्र.१ ते ४, शिवाजीवाडी, मोशी.
 दिघी, चऱ्होली- दिघी विभागीय कार्यालय लोटस पॅराडाईज, पहिला मजला, दत्तनगर, दिघी.
 पिंपरी वाघेरे, पिंपरी नगर- जुने दुय्यम निबंधक कार्यालय इमारत कै. नंदकुमार जाधव उद्यान समोर, अशोक चित्रमंदिर जवळ, पिंपरी.