– शिवसेना फोडणाऱ्या अमित शाह यांच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. १६ (पीसीबी) : ज्यांनी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडून पक्ष खिळखिळा केला, त्या एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक तथा शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांंच्या घरी गणपती दर्शनासाठी हजेरी लावली. तसेच, शिवसेना फुटीमागे हात असलेले (मुंबईतील भाषणामुळे उघड झाले आहे) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव, भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शहा (Jay Shah) यांना नार्वेकर यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे शिंदे यांची भेट आणि जय शहांना दिलेल्या शुभेच्छांमुळे शिवसैनिकांमध्ये नार्वेकरांबद्दल कुजबूज सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून संघटना ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्या शिंदेंना ठाकरेंचे स्वीय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर भेटले. बंडानंतरच्या दोन-अडीच महिन्यांतच शिंदे-नार्वेकर दोनदा एकत्र आले. त्यानंतर नार्वेकरही उद्धव ठाकरेंनी साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र,‘मी उद्धव ठाकरेंचा आनंद दिघे आहे,’ असे सांगून नार्वेकरांनी चर्चांवर पडदा टाकला. पण, त्यानंतरही नार्वेकर यांनी चक्क केंद्रीय गृहमंत्री आणि ज्यांच्यामुळे शिवसेना भाजपपासून दूर होत महाविकास आघाडीत सामील झाली त्या अमित शहा यांच्या मुलाला नार्वेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अर्थात या शुभेच्छा त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या टी-२० मुंबई लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष या नात्याने दिल्या आहेत. मात्र, त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांना सध्याच्या पदावर कायम राहण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर नार्वेकरांनी शहा, गांगुलींच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. ‘प्रोटोकॉल’नुसार नार्वेकर यांनी शहा यांना शुभेच्छा दिल्याही असतील मात्र, विद्यमान राजकीय परिस्थितीमुळे त्यामागील वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
बंडखोरीपासून ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातून विस्तवही जात नाही. भरीस भर म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यापासून छोटे-मोठे भाजप नेते ठाकरेंना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे इशारे देत आहेत. या साऱ्यांमध्ये शिंदेंच्या बाहुत बळ भरून शिवसेनेला अर्थात् ठाकरेंना एकाकी पाडण्याची रणनीती आहे. पण, ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि शिंदे यांच्यातील मैत्री कायम असल्याचे गणेशोत्सवात दिसून आले आहे. या भेटीला काही दिवस झाले असतानाच शहांमुळे नार्वेकर राजकीयदृष्ट्या चर्चेत आले आहेत.