मित्राला मारहाण केल्याच्या गैरसमजातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला

0
902

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) -मित्राला मारहाण केल्याचा गैरसमज करून घेत दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तलवार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 6) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास महेशनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

सलीम पटेल, सुनील वग्गी, जुबेर शेख, शुभम दुबे (चौघे रा. कासारवाडी), सुशांत सोनवणे (रा. बोपोडी) आणि अन्य पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तोहीद अस्लम शहा (वय 21, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोहीद यांनी आरोपी यांचा मित्र आयान याला मारहाण केल्याचा गैरसमज आरोपींना झाला. त्यातून आरोपींनी तोहीद यांच्यावर तलवार आणि कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.