मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेश मधून अटक

0
151

गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

दि 3 एप्रिल (पीसीबी )- मोबाईल फोडला म्हणून तरुणाने एकाच खोलीत राहणाऱ्या सहकारी मित्राचा गळा आवळून आणि लोखंडी तव्याने मारून खून केला. ही घटना 28 मार्च रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास महाळुंगे इंगळे येथे घडली. खून केल्यानंतर आरोपी पळून गेला होता. त्याला गुन्हे शाखा युनिट तीनने मध्य प्रदेश मधील दमोह जिल्ह्यातून अटक केली आहे.

रामसिंग सुलतानसिंग गोंड (वय 30, रा. रेयाना ता. जि. दमोह, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कालू मंगल रकेवार (वय 23, रा.महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. पथरीया, ता. जि. दमुही, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कालू याचा भाऊ पप्पू मंगल रकेवार यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू, कालू आणि रामसिंग हे तिघे एकाच कंपनीत ठेकेदारीवर काम करत होते. तिघेही एकाच खोलीत राहत होते. 26 मार्च दरम्यान रामसिंग याने कालू याचा मोबाईल फोडला. त्यानंतर 28 मार्च रोजी कालू याने रामसिंग याचा मोबाईल फोडला. कालू याचा भाऊ फिर्यादी पप्पू त्यावेळी भाजी आणण्यासाठी बाहेर गेला होता. मोबाईल फोडल्याच्या कारणावरू कालू आणि रामसिंग यांच्यात वाद झाला.

भाजी घेऊन पप्पू रात्री दहा वाजता घरी आला. त्यावेळी कालू हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. रामसिंग हा कालू याच्या छातीवर बसून त्याला लोखंडी तव्याने मारहाण करत होता. तसेच कालू याच्या गळ्याभोवती कपड्याने आवळून मारण्याचा प्रयत्न करत होता. खून केल्यानंतर रामसिंग पळून गेला.

गुन्हे शाखेने आरोपी रामसिंग याला अटक करण्यासाठी दोन पथके तयार केली. रामसिंग याने मोबाईल फोन बंद केल्याने त्याचे तांत्रिक विश्लेषण देखील करता येत नव्हते. रामसिंग हा त्याच्या मूळ गावी गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट तीनचे एक पथक मध्य प्रदेश मधील दमोह जिल्ह्यात रीयाना गावात पोहोचले. त्यावेळी रामसिंग हा पोलिसांची चाहूल लागल्याने तिथूनही पळून जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, ऋषिकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हणमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सूर्यवंशी, सुधीर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे, महेश भालचिम यांनी केली.