पिंपरी, दि. 28 (पीसीबी) – मित्रांसोबत पोहायला गेलेला आठ वर्षीय चिमुकला पवना नदी पात्रात बुडाला. पिंपरीगाव येथील बोट क्लबजवळ शनिवारी (दि. २६) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.
विशाल भीम थापा (८, रा. इंद्रायणीनगर, डिलक्स चौक, पिंपरी, मूळ रा. नेपाळ), असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा त्याच्या काही मित्रांसोबत पवना नदीत पोहायला गेला. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला. मात्र, अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. रविवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.
विशाल याचे वडील भीम काशीराम थापा हे एका हॉटेलमध्ये काम करतात. तर त्याची आई मीना थापा मजुरीचे काम करते. तसेच विशाल याला एक चार वर्षीय भाऊ आहे. मूळचे नेपाळ येथील असलेल्या भीम थापा यांनी त्यांच्या दोन मुलांना आणि पत्नीला दोन महिन्यांपूर्वी नेपाळ येथून पिंपरीत आणले होते. विशाल याला पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळेत पाठण्याचा नियोजन केल्याचेही वडील भीम थापा यांनी सांगितले.
मित्रांनीही केला प्रयत्न
विशाल याला नदी पात्रात बुडताना पाहून तेथे असलेल्या त्याच्या समवयीन मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्यातील एकाने विशाल याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते विशालला बाहेर आणू शकले नाहीत.