– पुणे पोलिसांच्या कारवाईने मोठी खळबळ
पुणे, दि. २० (पीसीबी) – पुणे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल १०० कोटीहून अधिक रक्कमेचे ड्रग्स जप्त केले आहे. ड्रग्स तस्कर मिठाच्या आडून ही विक्री करत होते. विश्रांतवाडी येथे करण्यात आलेल्या कारवाईत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल ५२ किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत २ कोटी रुपये आहे. दरम्यान, सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी असलेले पुणे शहर आता ड्रग्जची बाजारपेठ झाल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सापडू नये म्हणून हे आरोपी मिठाच्या पॅकमध्ये या पावडरची विक्री करत होते.या कारवाई संदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने शहरातील विश्रांतवाडी भागात छापा टाकला. या संदर्भात गुप्त बतमीदारांकडून गुन्हे शाखेतील युनिट १ च्या पथकाला सोमवार पेठेत एक चारचाकीमध्ये सराईत गुन्हेगार वैभव हा एमडी ड्रगची डिलिव्हरी देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या बाबत सापळा रचला. आरोपी येताच दबा धरून बसून असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे १ कोटी रुपयांचे ५०० ग्रॅम एमडी आढळून आले. पोलिसांनी दोघांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी एमडी देणाऱ्या हैदर शेखची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी हैदर शेखला अटक करत त्याच्या कडून देखील एक कोटीचे ५०० ग्रॅम एमडी जप्त केले. त्याला अटक करून त्याची चौकशी केली असता. त्याने त्याच्या मिठाच्या गोदामात तब्बल ५२ किलो एमडी लपवले असल्याचे आढळले.पुण्यात ड्रग्स तस्कर ललित पाटील याला अटक केल्यावर करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे. या कारवाईत मोठी आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणारी टोळी उद्ध्वस्त झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणात पुण्यात मिळणाऱ्या ड्रग्समुळे पुण्यातील तरुणाई चालली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये ड्रग्ज तस्कर ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांकडून ससून रुग्णालयाच्या परिसरात सव्वादोन कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले होते.